नवी दिल्ली दि.२७ – हरियानातील मारूतीचा उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा कोणताही विचार नाही तसेच गुजराथेतील प्रकल्पात २०१५ पासून मारूतीचे उत्पादन सुरू करण्यात येईल मात्र त्यापूर्वी बाजारस्थितीचा आढावा घेतला जाईल असे मारूतीचे सीओओ एस वाय सिद्दिकी यांनी सांगितले. मणेसर प्रकल्पातील उत्पादनाबाबतचे चित्र सप्टेंबरमध्ये स्पष्ट होईल असे सांगतानाच त्यांनी जुलैतच मारूतीची प्रतीक्षायादी १२ हजारांवर गेली असल्याचेही स्पष्ट केले. मणेसर येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर कांही बुकींग रद्द झाले मात्र नवीन बुकींगचे प्रमाण खूपच अधिक असल्याचे ते म्हणाले.
मारूती सुझुकीचे अध्यक्ष व सीईओ ओसामू सुझुकी यांनी हरियाणा हे आपले पहिले घर आहे तर गुजराथ हे दुसरे घर आहे असे सांगून कंपनी भारतातून बाहेर पडण्याचा विचार करत नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले गेली ३० वर्षे आम्ही हरियाणात आहोत. गुजराथेतील प्रकल्पाचे जागा संपादन झाले आहे मात्र तेथील उत्पादन सुरू होण्यास आणखी अडीच ते तीन वर्षे लागणार आहेत. मणेसर प्रकल्पातील उत्पादन २१ ऑगस्टपासून सुरू झाले असले तरी ते सध्या नेहमीच्या उत्पादनाच्या निम्मेच आहे. आत्तापर्यंत ९०० स्विफट डिझायर गाड्या उत्पादित झाल्या आहेत व कंपनीत ६८ टक्के कामगार कडक सुरक्षा व्यवस्थेखाली कामावर रूजू झाले आहेत. ५०० कामगारांना कमी करण्यात आले आहे. गुजराथेतील प्रकल्पाची क्षमता ५ लाख वाहनांची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.