मोबाईल कव्हर करणार किरणोत्सर्गापासून बचाव

मेलबर्न: मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असला तरी त्याच्या वापरामुळे कर्करोग होण्याची भीतीही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र मोबाईल फोन पासून होणारा किरणोत्सर्ग ९५ टक्क्यांपर्यंत कमी करणारे कव्हर तयार करण्यात यश आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

गेल्या दशकात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. मात्र त्याचबरोबर मोबाईल फोनपासून होणार्‍या मायक्रोवेव्हज उत्सर्जनामुळे कर्करोग होऊ शकतो; ही बाबही पुढे आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील हा धोका अधोरेखित केला आहे.

मात्र सध्याच्या काळात लोकप्रिय असलेल्या स्मार्ट फोन्ससाठी कर्करोगाचा धोका ९५ टक्क्यांनी कमी करणारे कव्हर बनविण्यात यश मिळविल्याचा संशोधकांचा दावा आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा अंतराळ यान बनविण्यासाठी ज्या पदार्थांचा उपयोग करते; त्याचाच वापर करून हे कव्हर बनविल्याचे सांगण्यात येते.

या कव्हरच्या वापरामुळे फोनपासून होणारा किरणोत्सर्ग ९५ टक्क्यांनी कमी होत असल्याने कर्करोगाची शक्यताही तितक्याच प्रमाणात कमी होत असल्याचा उत्पादकांचा दावा आहे.

Leave a Comment