अण्णा हजारे यांचे नक्षलवाद्यांशी संबध: सुब्रमण्यम स्वामी

सतना: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे नक्षलवाद्यांशी संबध असल्याचा आरोप जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. नेहेमीच वादग्रस्त विधाने करणार्या स्वामी यांनी हा खळबळजनक आरोप करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

टीम अण्णामध्ये नक्षलवादाला समर्थन देणारी मंडळी आहेत. अण्णांनी त्यांच्याशी संबंध तोडले तर आपण त्यांना समर्थन देण्याचा विचार करू शकतो; असे विधान स्वामी यांनी केले. मात्र अण्णांची लोकापालाची मागणी चुकीची असून लोकपाल आल्याने भ्रष्टाचार संपुष्टात येईल हा भ्रम असल्याचा दावा त्यांनी केला. सध्या आपण योगगुरू रामदेव बाबा यांच्या आंदोलनात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना २-जी स्पेक्ट्रम घोटाळयाप्रकरणी क्लीन चिट दिल्याबाद्दलाही स्वामी यांनी आश्चर्य व्यक्त केले. चिदंबरम यांच्या सहभागाबाबत आपण ठाम असून सर्वोच्च न्यायालयात त्यासंबंधी फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.