कांडाच्या दबावानेच घेतला गीतिकाचा बळी

नवी दिल्ली: गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणाचा तडा लावल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आपल्याशी संबंध कायम ठेवण्यासाठी हरियाणाचा माजी मंत्री गोपाल कांडा याने दबाव आणल्यामुळेच गीतिकाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

गीतिकाला कांडाबरोबर असलेल्या संबंधांना पूर्णविराम द्यायचा होता. कांडा मात्र त्यासाठी तयार नव्हता. त्याने गीतिकाला पोकळ आश्वासने देण्याबरोबरच धमक्याही दिल्या. त्यामुळे त्रस्त होऊन गीतिकाने आत्महत्या केली; असा पोलिसांचा दावा आहे.

गीतिका आत्महत्या प्रकरणावरून हरियाणा विधानसभेत चक्क हाणामारीच जुंपली. विरोधकांनी या प्रकरणी चर्चेची मागणी केली. सत्तारुढ पक्षाने ती नाकारली. यावरून आमदार अभय चौताला आणि जय भगवान यांचा वाद मुद्द्यावरून गुद्द्यांपर्यंत पोहोचला.

गीतिकाला न्याय मिळावा यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीत जंतर मंतर येथे निदर्शने केली.