नवी दिल्ली: सत्तारूढ काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्ष या दोघांनी हातमिळवणी करून कोळसा खाण घोटाळा घडवून आणल्याचा आरोप बरखास्त टीम अण्णाचे सदस्य आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्याविरोधात रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोळशाच्या खाणींचे वाटप लिलाव पद्धतीने न करता मागेल त्याला खाण अशा मनमानी पद्धतीने केल्याने देशाचे १ लाख ८६ हजार कोटीचे नुकसान झाले असून खाजगी उद्योगांचा फायदा झाला आहे; असा ठपका कॅगने केंद्र सरकारवर ठेवला आहे.
या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी म्हटले आहे की; हे प्रकरण आम्ही दि. २५ मे रोजीच उघड केले असून आमचे सर्व आरोप आता खरे ठरले आहेत. खाण वाटपाच्या निर्णय प्रक्रियेत राज्य सरकारेही सहभागी असल्याने खाण घोटाळयालाही सर्वच राजकीय पक्ष जबाबबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोळसा खाण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा केजरीवाल यांनी मागील आठवड्यातच सरकारला दिला होता.