राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त

मुंबई: राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर करून या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार मंत्रिगटाकडे आर्थिक मदत मागण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ज्या तालुक्यात ५० टक्क्याहून कमी पाऊस झाला किंवा ५० टक्क्यापेक्षा कमी पेरण्या झाल्या त्या तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा निर्णय झाला.

राज्यात काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता बहुतेक सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. चारा आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भीषण बनली आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन १२३ तालुके दुष्काळी म्हणून घोषित करण्यात येतील.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे दुष्काळ निवारणासाठी पवारांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय मंत्रिगटाची भेट घेणार आहेत.

Leave a Comment