मानेसर प्रकल्पात मारुतीचे उत्पादन सुरू

नवी दिल्ली: कामगारांच्या संघर्षामुळे महिनाभर बंद असलेला मानेसर येथील मारुती कार उत्पादन प्रकल्प मंगळवारपासून पुन्हा सुरू होत आहे. या प्रकल्पात गैरप्रकार टाळण्यासाठी खाजगी सुरक्षा रक्षकांबरोबरच मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पात ३०० कामगार दररोज १५० कारचे उत्पादन करतील.

जुलै महिन्यात कामगारांच्या हिंसक आंदोलनामुळे एका वरिष्ठ अधिकार्‍याचा मृत्यू झाला आणि प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे व्यवस्थापनाने हा प्रकल्प अनिश्चित काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र मंगळवार पासून कंपनीने उत्पादन काही प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसाला १ हजार ७०० गाड्यांचे उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पात सध्या पहिल्या टप्प्यात दिवसाला १५० गाड्यांचे उत्पादन करण्यात येणार असून टप्प्या टप्प्याने ही संख्या वाढविण्यात येणार आहे.

प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी कंपनीने लष्करातून निवृत्त झालेल्या जवानांचे खास सुरक्षा पथकही नियुक्त केले आहे.