कौन्सेलर किंवा समुपदेशक

विद्यार्थी दहावी-बारावी उत्तीर्ण झाले किंवा पदवी परीक्षा देऊन बाहेर पडले की, आता पुढे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. तो केवळ उभाच राहतो असे नाही तर त्यांना गोंधळात सुद्धा टाकतो. अशावेळी त्यांनी पुढे कोणत्या वाटा चोखाळाव्यात याचे मार्गदर्शन त्यांना कोणाकडून तरी मिळण्याची गरज असते. असे मार्गदर्शन करणे हा सुद्धा एक चांगला व्यवसाय आहे आणि मानसशास्त्राची जाण असणार्या कोणाही तरुण-तरुणीला व्यवसाय मार्गदर्शनाचे आणि समुपदेशनाचे हे कार्य करून आपले करिअर घडवता येते. एकंदरीत युवकांनी आपले करिअर कसे घडवावे, याचे मार्गदर्शन करणारे हे करिअर आहे.

हे व्यावसायिक विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा दाखवताना अनेक पद्धतींनी चाचपून पहात असतात. व्यवसाय मार्गदर्शन म्हणजे केवळ अधिक पगाराच्या नोकर्या मिळवून देणारा अभ्यासक्रम दाखवून देणे नव्हे. त्या विद्यार्थ्याला कशाची आवड आहे, त्याचे छंद काय आहेत आणि त्याची कुवत किती आहे याचा अंदाज घेऊन त्याला व्यवसाय किंवा नवी विद्या शाखा सुचविली जात असते. अशावेळी त्या मुलांची कल चाचणी आणि बुद्धांकाची चाचणी करावी लागते आणि त्यासाठी अशा समुपदेशकाचा मानसशास्त्राचा अभ्यास झालेला असणे आवश्यक असते. देशामध्ये, परदेशामध्ये आणि विशेष करून आपल्या राज्यामध्ये उपलब्ध असलेल्या शिक्षणाच्या संधी, त्या संधी उपलब्ध करून देणार्या शिक्षण संस्था यांची माहिती या समुपदेशकाला तपशीलवार असण्याची गरज असते. या दृष्टीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करताना त्यांच्या पालकांनाही सोबत घ्यावे लागते. अनेक समुपदेशक आणि व्यवसाय मार्गदर्शक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची माहिती व्हावी यासाठी सेमीनार किंवा शिबिरे सुद्धा घेत असतात. काही समुपदेशक ही माहिती देणारे प्रदर्शने सुद्धा भरवतात. काही वेळा विद्यार्थ्यांच्या आत्म-हत्यांचे आव्हान सुद्धा त्यांच्या समोर उभे असते. काही शिक्षण संस्थांनी आता आपल्या शाळा-महाविद्यालयां मध्ये समुपदेशकांची पूर्णवेळ नियुक्ती करायला सुरुवात केलेली आहे. ही करिअर संधी साधण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम अनेक प्रकारचे आहेत.

विशेषत: मानसशास्त्राची पदवी मिळविलेली असेल तर त्यानंतर व्यवसाय मार्गदर्शनाचे छोटे छोटे अभ्यासक्रम करता येतात आणि त्यातून व्यवसाय मार्गदर्शक बनता येते. एन.सी.ई.आर.टी. या संबंधीचा एक छोटा पदविका अभ्यासक्रम आहे. चौकशीसाठी पत्ता : http.www. ncert.nic.in  असा आहे. त्याशिवाय तमिळनाडूतील राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट या संस्थेतर्फेही व्यवसाय मार्गदर्शकांचा अभ्यासक्रम चालवला जातो.  http.www. rgniy.gov.in या पत्त्यावरून सविस्तर माहिती मिळवावी. कर्नाटक विद्यापीठातही या विषयाचा अभ्यासक्रम आहे. 

 

1 thought on “कौन्सेलर किंवा समुपदेशक”

Leave a Comment