गीतिका आत्महत्या प्रकरणात कांडा पोलीस कोठडीत

नवी दिल्ली: हवाई सुंदरी गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर शनिवारी पहाटे त्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. न्यायालयाने त्यांना ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

गीतिका शर्मा या एकेकाळच्या हवाई सुंदरी आणि कांडा यांच्या हवाई कंपनीतील उच्चाधिकारी अधिकारी महिलेने आत्महत्या करताना लिहिलेल्या चिठ्ठीत कांडा आणि त्यांची सहकारी अरुणा चढ्ढा यांच्याकडून मानसिक छळ झाल्याचा उल्लेख आहे. चढ्ढा यांना यापूर्वीच अटक झाली असून कांडा हे पोलिसांना गुंगारा देत गायब होते. तपासादरम्यान गीतिका हिचे अनैसर्गिक रीतीने लैंगिक शोषण झाल्याची बाबही पुढे आली आणि या गुन्ह्याचे गांभीर्य अधिकच वाढले.

न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची आशा संपुष्टात येताच कांडा अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहेत. शुक्रवारीच कांडा देश सोडून नेपाळला गेल्याची कुणकुण तपासा यंत्रणांना लागली होती. त्यानुसार न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट घेऊन पोलिसांनी कांडा यांना अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्याची तयारी केली होती.