लक्ष्मणचा कसोटी क्रिकेटला रामराम

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील एक शैलीदार फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. लक्ष्मण याने अनपेक्षितरित्या निवृत्ती जाहीर केल्याने त्याच्या जगभरातील चाहत्यांना धक्का बसला आहे.

भारतीय क्रिकेट संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दि वॉल राहुल द्रविड आणि दादा सौरव गांगुली असे दिग्गज फलंदाज असताना त्यांच्या छायेत झाकोळून न जाता लक्ष्मणने भारतीय संघातील मधल्या फळीचा आधारस्तंभ आणि मॅच विनिंग फलंदाज म्हणून आपले स्थान निश्चित केले. टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान प्राप्त करून देण्यात लक्ष्मणचा मोठा वाटा आहे.

हैद्राबादचा खेळाडू असलेल्या ३७ वर्षीय लक्ष्मणने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत १७ शतकांसह ८ हजार ७८१ धावा लुटल्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका कसोटीत फॉलो ऑन घेऊन खेळणार्‍या भारतीय संघाला लक्ष्मणच्या २८१ धावांच्या झुंजार खेळीने विजय मिळवून दिला. या अजरामर खेळीने क्रिकेट जगतात त्याने नावलौकिक प्राप्त केला.

यापुढे भारतीय संघ आणि क्रिकेट जगत एका शैलीदार फलंदाजाच्या नजरबंदी करणार्‍या खेळाला मुकणार आहे.

Leave a Comment