मुलायम सिंहाना पडताहेत पंतप्रधान पदाची स्वप्न

लखनौ: आगामी लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी संघटीत करून दिल्लीवर धडक मारण्याच्या दृष्टीने समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी कंबर कसली आहे. त्या दृष्टीने उत्तर प्रदेशातून आपल्या पक्षाचे ६० खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांसमोर ठेवले आहे.

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा पंतप्रधान न होता तिसर्‍याच लहान पक्षाचा पंतप्रधान होईल; असे भाकीत भाजपाचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवानी यांनी वर्तविल्यापासून मुलायम सिंह यांना पंतप्रधान पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यासाठी तिसरी आघाडी संघटीत करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

विधानसभा निवडणुकीत अखिलेश सिंह यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला अनपेक्षित यश मिळाले असले तरीही या यशाची लोकसभा निवडणुकीत पुनरावृत्ती करायची असेल तर अखिलेश यांच्या सरकारच्या कामगिरीवरच ते अवलंबून आहे; याची जाणीव मुलायम यांना आहे.

त्यामुळेच अखिलेशसह आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनाही प्रसंगी खडे बोल ते सुनावत आहेत. सरकारने लवकरात लवकर आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यावर त्यांचा भर आहे. जनतेची गार्‍हाणी ऐकण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात जनता दरबार घेण्याचे आदेश त्यांनी मंत्र्यांना दिले आहेत.

Leave a Comment