बिल्डर लॉबीविरोधात पृथ्वीराज चव्हाणांनी थोपटले दंड

मुंबई दि.८- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे २०१० सालात घेतल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिला हातोडा राज्यातील बिल्डर लॉबीवर चालविला होता. परिणामी बिल्डर लॉबी चव्हाणांवर सुरवातीपासूनच नाराज आहे हे उघड गुपित बनले आहे. मात्र या नाराजीला भीक न घालता मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्याचे हौसिंग रेग्युलेटरी बिल राष्ट्रपतींच्या सहीसाठी ताबडतोब पाठविले जावे अशी विनंती करणारे पत्र पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नागरी विकास मंत्री कमलनाथ यांना लिहीले असल्याचे समजते. राज्यातील नागरिकांच्या हितासाठी आणि हौसिंग सेक्टरवरील नियंत्रणासाठी हा कायदा होणे अत्यंत गरजेचे असल्याचे चव्हाण यांनी लिहिले आहे.

हे बिल जेव्हा तयार झाले तेव्हा ते आहे त्याच स्वरूपात पास केले जाऊ नये म्हणून बिल्डर लॉबीने प्रचंड विरोध केला होता. मात्र तरीही हे बिल विधानसभा अधिवेशनात मंजूर करण्यात आले. आता राष्ट्रपतींनी त्यावर सही केली की त्याचे कायद्यात रूपांतर होऊ शकणार आहे. हौसिंग रेग्युलेटरी बिलच्या स्वरूपात बिल्डरविरोधात करण्यात आलेली देशातली ही पहिलीच कृती असून त्या बिलनुसार जे बिल्डर किंवा विकसक रेग्युलेटरी ऑर्डर्स पाळणार नाहीत त्यांना १० लाख रूपये दंड अथवा किमान तीन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बिल्डर, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांची राज्यात अभद्र युती असल्याचे व त्यांनी मुंबई विकायलाच काढली असल्याचे वक्तव्य केले होते. आता मनमोहनसिंग, सोनिया व कमलनाथांना पत्र लिहून त्यांनी ही युती मोडून काढण्याचे आपले हेतू पुन्हा स्पष्ट केले आहेत. तर दुसरीकडे बिल्डर लॉबी मुख्यमंत्र्यांचे आसन अस्थिर करण्याचे प्रयत्न सातत्याने करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रयत्नांना उत्तर म्हणून ही चाल खेळली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment