लंडन दि.८- कोरिया अॅन्डव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी या संस्थेतील संशोधकांनी घडी घालता येणारी अथवा गुंडाळून खिशात ठेवता येणारी बॅटरी विकसित करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे भविष्यात फोन डिव्हायसेसच्या दुनियेत क्रांती घडून येण्याची शक्यता असून सध्याच्या आयताकृती उपकरणातून ग्राहकांना सुटका मिळेल. भविष्यातील फोन उपकरणेही या बॅटरीमुळे घडी घालता येणारी अथवा गुंडाळी करता येणारी असू शकतील असा संशोधकांचा दावा आहे.
उपकरणाला पॉवर पुरविणार्या या बॅटरीच्या क्षमतेत सध्या तरी वाढ करण्यात आलेली नाही. सध्याच्या बॅटर्या ज्या मटेरियल पासून बनतात त्यात त्यांचा आकार बदलू शकत नाही. त्यामुळे या बॅटर्या सामावून घेण्यासाठी उपकरणांचा आकारही आयताकृती ठेवला जातो असे या संशोधक पथकाचे प्रमुख किओन जी ली यांनी सांगितले. ते म्हणाले त्यांच्या पथकाने तयार केलेली हाय परफॉर्मन्स फ्लेक्सिबल ऑल सॉलिड स्टेट बॅटरी फोनमध्ये कशीही बसविली तरी पॉवर पुरवू शकते. फोन सोबतच ईबुक , टॅब्लेटसारख्या अन्य उपकरणांतही ती वापरता येणार आहे. मुख्य म्हणजे ही बॅटरी रिचार्जेबल आहेच पण ती मुख्यत्वे ऑरगॅनिक मटेरियल तसेच मायक्रो स्ट्रक्चरल इनऑरगॅनिक मटेरियलपासून व पॉलिमरचा वापर करून बनविली गेली असल्याने तिची घडी घालणे अथवा गुंडाळी करणे शक्य आहे. पातळ व फ्लेक्सिबल डिस्प्लेवरून हे तंत्रज्ञान विकसित करण्याची कल्पना सुचल्याचेही त्यांनी सांगितले.