मानवी बॉम्ब ऐवजी आता गाढवी बॉम्बचा वापर

काबूल दि. ७ -अफगाणिस्तानात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट करण्यासाठी आता नवीन तंत्राचा वापर सुरू केला असून बॉम्बवाहक म्हणून प्रथमच गाढवाचा वापर करण्यात आला आहे. या बॉम्बच्या स्फोटात वरीष्ठ पोलिस अधिकारी ठार झाला असून अन्य तीन पोलीस जखमी झाले आहेत. स्फोटात गाढवाचाही बळी गेला आहे.

याविषयी समजलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात चारसद्दा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गाढवावर सुरूंग लादून हे गाढव जिल्हा पोलिस मुख्यालयासमोर बांधून ठेवले होते. जिल्हा पोलिस प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयात प्रवेश करताच या बॉम्बचा रिमोटच्या सहाय्याने स्फोट करण्यात आला. त्यात हे अधिकारी जागेवरच ठार झाले तर कार्यालयातील अन्य तीन पोलिस जखमी झाले. या स्फोटाचा संशय तालिबान्यांवर घेण्यात आला असून या स्फोटातून तालिबान्यांची माणसे व मुक्या प्राण्यांशी असलेली वागणूक किती क्रौर्याची आहे याचाच पुरावा दिला गेला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.