पुन्हा मोहम्मद हमीद अन्सारी उपराष्ट्रपती

नवी दिल्ली, दि. ८ – विद्यमान उपराष्ट्रपती आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार मोहम्मद हमीद अन्सारी मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ४९० मते मिळवून निवडून आले.

लोकसभा आणि राज्यसभेच्या ७८७ खासदारांपैकी ७४० खासदारांनी मतदान केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जसवंत सिंग यांना २३८ मते मिळाली. सकाळी दहा वाजता संसदेत मतदानाला सुरुवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंतच ६०० खासदारांनी मतदान केले होते.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी तसेच भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, मुरली मनोहर जोशी, बसपच्या प्रमुख मायावती आणि सपचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांनी सकाळीच मतदान केले. ४७ खासदारांनी मतदान केले नाही. त्यामध्ये बिजू जनता दल, तेलुगू देसम पक्ष आणि क्रांतीकारी समाजवादी पक्ष यांच्या ३४ सदस्यांचा समावेश आहे. या पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.

आजारी असलेले विलासराव देशमुख आणि शत्रुघ्न सिन्हा, तसेच वायएसआर कॉंग्रेसच्या जगनमोहन रेड्डी, परदेशी असलेले काकोली दस्तीदार आणि कबीर सुमन मतदानाला उपस्थित राहिले नाहीत. देशाच्या १४ व्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण ७८८ खासदार मतदानास पात्र असतात. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरु होते. संध्याकाळी ६ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आणि लगचेच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निर्णय जाहीर करण्यात आला. 

Leave a Comment