पुणे आणि पिंपरी चिंचवडवर लवकरच सीसी टीव्ही यंत्रणेची करडी नजर

पुणे: जंगली महाराज रस्त्यावर साखळी बॉम्बस्फोट झाल्यावर राज्य पालकमंत्री आणि यंत्रणांना जाग आली असून जर्मन बेकरी बॉम्बस्फोटापासून भिजत पडलेले शहरात सीसी टीव्ही बसविण्याचे घोंगडे मार्गी लावण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

शहरात १ ऑगस्ट रोजी साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांनी पुण्याला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सीसी टीव्ही यंत्रणांचे जाळे शहरात निर्माण करण्यात येईल; असे पवार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वास्तविक जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानंतर पुणे शहर हे दहशतवाद्यांचे सॉफ्ट टारगेट असल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरात किमान संवेदनशील ठिकाणी सीसी टीव्ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रस्तावही तयार करण्यात आला. मात्र महापालिका आणि पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने ही योजना पुढे सरकली नाही.

मात्र नुकत्याच जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी सर्व शासकीय यंत्रणा आणि पदाधिकार्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. सीसी टीव्ही यंत्रणेच्या अभावी तपास यंत्रणेला अद्याप आरोपींची ओळख पटविण्याबाबत चाचपडावे लागत आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातील महत्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही यंत्रणा उभारण्याच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे पवार यांनी सांगितले. या यंत्रणेसाठी दोन्ही महापालिका, राज्य शासन यांच्याकडून आणि आमदार निधीतून २० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील; असे त्यांनी स्पष्ट केले.