रोम: आपण दिलेल्या माहितीमुळेच अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्यापर्यंत अमेरिका पोहोचून त्याचा खात्मा करू शकली; असा दावा एका इटालियन महिला पत्रकाराने केला आहे. ओसामाची माहिती दिल्याबद्दल आपल्याला अमेरिकेने घोषित केलेले इनाम मिळावे; यासाठी तिने रोमन न्यायालयात अमेरिकन शासन आणि इटलीचा गृह विभाग यांच्या विरोधात दाद मागितली आहे.
लादेनला मागील वर्षी मे महिन्यात अमेरिकन नौदलाच्या विशेष कमांडो पथकाने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे कंठस्नान घातले होते.
लादेनचा ठावठिकाणा देणारी माहिती आपण सन २००३ मध्ये इटालियन गृह विभागाला दिली आणि त्यांनी ती अमेरिकेपर्यंत पोहोचविली. त्यामुळेच अमेरिकन कमांडोंना लादेनचा वध करणे शक्य झाले; असा दावा इटालियन महिला शोधपत्रकार मेरी पेस हिने केला आहे. आपल्या या योगदानामुळे लादेनला ठार मारण्यासाठी किंवा त्याचा ठावठिकाणा कळविण्यासाठी अमेरिकेने जाहीर केलेली अडीच कोटी डॉलर इनामाची रक्कम आपल्याला मिळावी; अशी मागणी करणारी याचिका मेरीने रोमन न्यायालयात दाखल केली आहे.
मेरीला तिच्या सूत्रांकडून लादेन पाकिस्तानातील अबोटाबाद येथे असल्याची माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारेच अमेरिका त्याचा मागोवा घेऊ शकली; असा दावा तिच्या वकिलांनी केला आहे.