अडवाणींची कबुली

भाजपाचे वयोवृद्ध नेते  लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवरून जे काही सांगितले आहे त्यावरून नेमके काय सूचित होते आणि राजकारणाची कोणती दिशा स्पष्ट होत आहे हे काही सांगता येत नाही पण त्यातून एक कबुली नक्कीच दिसत आहे. ती म्हणजे आपण पंतप्रधान होणार नाही हे अडवाणी यांनी मान्य केले आहे. वस्तुस्थिती तशीच आहे. भाजपाच्या हाती सत्ता येण्याची शक्यता नाही. तसे जर आहे तर मग उगाच पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहण्यात काय अर्थ आहे ? असा विचार त्यांनी केला आहे. ही कबुली देताना त्यांनी  आपल्या पक्षातल्या अनेक नेत्यांना मात्र अस्वस्थ करून सोडले आहे कारण त्यांच्या पक्षात पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे अनेक नेते आहेत. भाजपा सत्तेवर येणार नाही असे म्हणून अडवाणी यांनी याही नेत्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. २०१४ सालनंतर केन्द्रात काँग्रेस प्रणित संपुआघाडी पुन्हा सत्तेवर येणार नाही आणि भाजपा प्रणित रालोआघाडी सरकारही सत्तेवर येणार नाही. भाजपा आणि काँग्रेस यांना वगळून तिसराच ‘बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस’ असा कोणी तरी पंतप्रधान होईल असे अडवाणी यांनी म्हटले आहे.
 
सध्या राजकारणात सुरू असलेल्या सार्‍या अटकळी आणि चिंतनाला अडवाणी यांच्या या नव्या चिंतनाने वेगळेच वळण लागले आहे.   भाजपात आता मोठे स्वप्नरंजन सुरू आहे. सत्ता आपल्याच हातात येणार आणि आपल्याच पैकी कोणी तरी पंतप्रधान होणार असे भाजपा नेत्यांना मनोमन वाटत आहे. कारणे ठरलेलीच आहेत. सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संपुआघाडी लोकांच्या मनातून उतरली आहे,  तेव्हा लोकांना आता काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष नको झाले आहेत, अशा स्थितीत भारतातले मतदार भाजपालाच आपली पसंती देतील असा भाजपा नेत्यांचा होरा आहे. पण अडवाणी यांना तो मान्य नाही. तसा विचार केला तर भाजपा सत्तेवर येण्याच्या स्थितीत अडवाणी हेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार आहेत. मोदी पंतप्रधान व्हावेत असे भाजपाच्या नेत्यांना वाटत असले तरीही ते काही स्वबळावर ते पद प्राप्त करू शकणार नाहीत. त्यांना घटक पक्षांचा पाठींबा हवा आहे. ही स्पर्धा अजून सुरू नाही पण तोपर्यंतच नितीशकुमार यांनी मोदी पंतप्रधान म्हणून चालणार नाहीत असे म्हटले आहे.

 म्हणजे  मोदी यांचे अपील पक्षाच्या बाहेर नाही. भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार आलेच तर मोदी यांच्यापेक्षा अडवाणी आघाडीवर असतील कारण मित्र पक्षात त्यांना मान्यता आहे. अडवाणी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील असे भाजपाने अनेकवेळा स्पष्ट केले असले तरीही जनतेच्या दृष्टीने अडवाणी स्पर्धेत आहेत. याची काही कारणे आहेत. अडवाणी हे गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांनी उपपंतप्रधान म्हणून काम केले आहे. त्यांची प्रतिमाही चांगली आहे. अनुभव, प्रतिमा आणि आघाडीत मान्यता अशा बाबतीत अडवाणी यांच्यासारखा  पंतप्रधान पदाचा दुसरा उमेदवार भाजपाच्या जवळ आज तरी नाही आणि काँग्रेसमध्येही नाही. असे असताना स्वतः अडवाणी यांनीच आपण पंतप्रधान होऊ शकणार नाही असे स्वतःहून म्हटले आहे. म्हणजे त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही माघार त्यांची स्वतःचीच आहे असे नाही तर भाजपाचीही आहे. .अडवाणी यांनी भाजपाचा पंतप्रधान होणार नाही असे म्हटले आहे. त्यामागचे गणित कोणाही राजकीय विश्लेषकाला पटण्यासारखे आहे. कारण काँग्रेस पक्ष लोकांच्या मनातून उतरला आहे पण भारतीय जनता पक्ष काही लोकांच्या मनात फार भरलेला नाही. याचाच अर्थ तिसरीच कोणती तरी  आघाडी बहुमत प्राप्त करू शकेल.
 
गेल्या महिन्यात राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. तिच्यात प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी निर्णायक भूमिका वठवल्या. त्यातल्या त्यात ममता बॅनर्जी, मुलायसिंग यादव, मायावती, जयललिता इत्यादींनी आपापल्या राज्यात मोठेच यश मिळवून केन्द्राच्या राजकारणात आपणही निर्णायक भूमिका वठवू शकतो असे दाखवून दिले आहे. याचाच अर्थ असा की भाजपा आणि काँग्रेस सोडून तिसराच कोणी तरी सत्तेवर येईल असा निघतो. भारतात केन्द्रात राजकीय अस्थिरतेचे युग आल्यापासून म्हणजे आघाडी सरकारचा जमाना सुरू झाल्यापासून अशी सरकारे अनेकदा आलेली आहेत. व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर, चरणसिंग, देवेगौडा, गुजराल यांची सरकारे अशीच होती. ती फार टिकली नाहीत. त्यामुळे आताही असे सरकार आले तर तेही फार काळ टिकणार नाही असे अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. एकंदरीत अडवाणी यांचे हे सारे ब्लॉग लेखन सध्याच्या राजकारणावर प्रकाश टाकणारे आहे कारण स्थिती तशीच आहे. मात्र येणारे सरकार फार काळ टिकणार नाही हे निदान सकारात्मकरित्या घेता येत नाही. बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस नेते एकदिलाने नांदले तर तेही सरकार टिकू शकते.

Leave a Comment