दुबईकर ’हिरोइन’वर नाराज

दुबईकर मधुर भांडारकरच्या ’हिरोइन’ चित्रपटातील एका संवादामुळे प्रचंड नाराज झाले आहेत. या नाराजीचा फटका बसू नये म्हणून फक्त दुबईत रिलिज करताना नाराजीचे कारण ठरलेला शब्द म्युट करण्याच्या किंवा काढून टाकण्याच्या पर्यायावर मधुर विचार करत आहे. 

`हिरोइन’च्या भूमिकेतील करिना चित्रपटातील एका प्रसंगात म्हणते, ’ हिरोइन ने गा़डी ली, तो बिजनस मैन ने गिफ्ट की… और वह दुबई गई, तो उसका रेट कार्ड बन जाता है…. | ’ हा संवाद दुबईकरांच्या नाराजीचे कारण ठरला आहे. दुबई म्हणजे देहव्यापाराचे प्रमुख केंद्र आहे, असेच हिरोइनच्या संवादातून अप्रत्यक्षपणे सुचवण्यात आले आहे ; असे हिंदी चित्रपटाचे फॅन असलेल्या दुबईकरांचे म्हणणे आहे. त्यांच्या भावनांचा मान राखत दुबईतील रिलिजच्या वेळी नाराजीचे कारण ठरलेला ’ दुबई ’ हा शब्द ऐकू येणार नाही किंवा त्याचा उच्चारच दिसणार नाही; अशी व्यवस्था करण्याचा विचार मधुर करत आहे. 

आखाती देशांमध्ये, प्रामुख्याने दुबईत आतापर्यंत मधुर भांडारकरने केलेल्या सर्व चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी दुबईतील रिलिजच्यावेळी चित्रपटाचे थोडे एडिटिंग करण्याची तयारी मधुरने केली आहे. मात्र भारतात सेन्सॉर बोर्डाने करिनाच्या संवादातील ’ दुबई ’ या शब्दाला आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे भारतातील प्रदर्शनात दुबई शब्दाचे कोणत्याही स्वरुपाचे एडिटिंग करणार नसल्याचे मधुरने स्पष्ट केले आहे.