अण्णा हजारे यांनी राजकीय पक्ष काढण्याची चूक करू नये, असे सुजाण लोकांना वाटत होते. पण कधी ना कधी ते ही चूक करणार अशीही भीती वाटत होती. ती अखेर खरी ठरली आहे. अण्णा उचलत असलेले हे पाऊल चुकीचे आहे कारण अण्णा ज्या उद्देशाने काम करीत आहेत त्याच्याशी ही कृती विसंगत आहे. अण्णांकडे नैतिक शक्ती आहे. तिच्या जोरावर त्यांनी आजच्या भ्रष्ट राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवावा अशी अपेक्षा आहे. अण्णा ते काम छान करीतही आहेत. त्यांनी तसे काम करून संसदेला माहितीच्या अधिकाराचा कायदा करायला सरकारला भाग पाडले आहे आणि त्या अधिकारामुळे किती भ्रष्टाचार उघड होत आहेत हे आपण पहातही आहोत. अशा प्रकारचा जनशक्तीचा आणि नैतिक शक्तीचा दबाव लोकशाहीत महत्त्वाचा असतो. तो अण्णाच निर्माण करू शकतात. ती क्षमता असणारा कोणीही नेता निदान आज तरी या देशात नाही. राजकीय पक्ष काढणारे खूप आहेत. त्यात अण्णांनी सामील होऊ नये आणि देशात निर्माण झालेली एक नैतिक शक्ती त्यांनी अशी दैनंदिन राजकारणाच्या दावणीला बांधू नये.
अण्णांना राजकीय पक्ष स्थापन करण्याची कल्पना काही स्वार्थातून आणि राजकीय महत्त्वाकांक्षेतून स्फुरलेली नाही. त्यांना सत्ताधारी पक्षाचे नेते सारखे खिजवत असतात. अण्णा काही लोकातून निवडून आलेले नाहीत आणि आम्ही मात्र निवडून आलेलो आहोत असे त्यांचे म्हणणे असते. या खिजवण्याची प्रतिक्रिया म्हणून अण्णांनी आपल्यालाही जनशक्तीचा पाठींबा आहे हे दाखवून देण्याची ही प्रेरणा झाली आहे. शरद पवार यांनी सुद्धा अण्णांना एकदा, निवडून येऊन दाखवाच, असे आव्हान दिले होते. अर्थात त्यावेळी ते अण्णांनी स्वीकारले नाही पण आता मात्र अण्णांनी राजकीय मैदानात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा या निर्णयामागचा हेतू कितीही चांगला असला तरी राजकारण हे क्षेत्र फार बदनाम झालेले आहे. शिवाय राजकीय पक्ष चालवणे आणि त्याला निवडणुकीच्या मैदानात उतरवून विजयी करणे हे काम जिकिरीचे असते. ते अण्णाना मानवणार नाही. झेपणारही नाही. राजकारण म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा ठरायला लागला आहे. अशा अड्ड्यांमध्ये अण्णांसारख्या सच्छील माणसाने पाय टाकू नये असे वाटते. एखादा माणूस राजकारणात शिरताना शुद्ध असतो; परंतु राजकारण यशस्वी करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे माणूस नंतर भ्रष्ट होतो. राजकारण शुद्ध करण्याच्या त्याच्या हेतूला हरताळ फासला जातो. आता राजकारणात शिरलेल्या आणि कार्यरत असलेल्या बहुतेक सर्वांनी त्यात शिरताना अनेक आदर्श कल्पना डोक्यात ठेवलेल्या होत्या. परंतु त्या सगळ्या कल्पनांना पायदळी तुडवल्याशिवाय राजकारण यशस्वी होत नाही असे त्यांच्याही लक्षात यायला लागले आहे. राजकारण गलिच्छ होत चालले आहे आणि त्यात शिरलेले लोकही मलीन होत चालले आहेत. त्यांना ताळ्यावर आणण्या साठी अण्णांसारख्या चारित्र्यवान लोकांनी राजकारणाच्या बाहेर राहून सतत आंदोलने केली पाहिजेत.
महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण यांनी अशीच भूमिका बजावली होती. गांधीजी कॉंग्रेसचे चार आण्याचेही सदस्य नव्हते पण कॉंग्रेस पक्षात ते म्हणतील तेच घडत असे. जयप्रकाश नारायण यांनीही राजकारणात सक्रिय भाग न घेता देशाला आणीबाणीतून मुक्त केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय जनता पार्टीचा अंकुश असाच आहे. संघाचे नेते कधी राजकारणात भाग घेत नाहीत पण संघ सांगतो तेच भाजपात होते. अण्णांना तसे करता येईल. अण्णांनी अशीच भूमिका पार पाडली पाहिजे. लोकपाल विधेययासाठी एवढे आंदोलन करूनही काही होत नाही म्हणून अण्णा नाराज झाले आहेत पण त्यापायी राजकीय पक्ष स्थापन करावा असे काही म्हणता येत नाही. राजकारणात निवडणुका लढवण्यासाठी प्रचंड पैसा लागतो. तो काळा आहे की गोरा आहे, याची चौकशी करण्याची सुद्धा सोय नसते. एकदा असा पैसा मिळवला की, राजकारण करणार्या व्यक्तीचे सारे हितसंबंध काळ्या पैशाशी निगडित होतात. तसे अण्णांचे होणार नाही पण अण्णांच्या पक्षातल्या नेत्यांचे तसे होऊ शकते. अण्णांची संघटना चालविण्याची शैली राजकीय पक्षाला उपयोगाला पडणारी नाही. राजकीय पक्षाचे कामकाज व्यवस्थित चालवावे लागते. ते अण्णांना जमत नाही.
आजवर अण्णांच्या शैलीमुळे त्यांच्या पासून अनेक लोक दुरावलेही आहेत. अण्णाच्या सोबत आज अनेक मोठे लोक आहेत. सगळे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत. पण केवळ हाच एक मुद्दा समान असून भागत नाही. त्यांची राजकीय विचारसरणीही समान असली पाहिजे. विचार सरणीवरच पक्षाचा मासबेस ठरत असतो. पक्षाची अशी विचारसरणी निवडण्याचा प्रश्न येईल तेव्हा हे सारे बुद्धिमंत एक राहतील का? सध्या टीम अण्णा भ्रष्टाचार विरोधी आंदोलन एवढाच मर्यादित विषय हाताळत आहे पण त्यांच्यात नेहमी वाद होत असतात. ही यंत्रणा राजकीय पक्ष म्हणून अधिक व्यापक विषय हाताळायला लागेल तेव्हा ते एकदिलाने राहण्याची शक्यता नाही.