हैती:पोर्ट-ओ-प्रिन्स या हैतीच्या राजधानीत २९ जुलैला सुरु झालेल्या तीन दिवसीय फुलांच्या उत्सवात हजारो लोकांनी सामील होऊन आनंद लुटला. या लोकोत्सवात संगीत जलसे, शोभायात्रा, स्ट्रीटडान्स, रंगीबेरंगी वेशभूषा, कसरती, आकर्षक सजावटी यांनी पर्यटक आणि नागरिकांचे लक्ष वेधले. या उत्सवात १५०० हौशी कलाकार सहभागी झाले. दहा हजार प्रेक्षकांनी या कार्निवल मध्ये हजेरी लावली.
शोभायात्रेत १३ संगीत फ्लोट होते. पहाटे तीन वाजेपर्यंत हे संचलन चालू होते. हैती सरकारने यंदा हा महोत्सव शहराच्या बाहेर आयोजित केला. देशात २०१० मध्ये झालेल्या भूकंपातील निर्वासितांचे आश्रयस्थान शहरात असल्याने सार्वजनिक ठिकाणी या महोत्सवास जागा नाही. राजधानीच्या इतिहासात महोत्सव शहराबाहेर घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पारंपारिक लोकोत्सवात सर्वाना आनंदाने सहभागी होता यावे व तो व्यवस्थित पार पडावा यासाठी व्यवस्थापनातर्फे योग्य ती काळजी घेतली गेली. मात्र या महोत्सवावर सरकार १६ लाख डॉलर एवढा अवाजवी खर्च करतंय यावर काही टीकाकारांनी टीकाही केली. परंतु या महोत्सवामुळे लोकांचे मनोधैर्य वाढणार आहे व त्यांना यातून व्यवसाय सुद्धा मिळणार आहे; अशी सरकारची भूमिका आहे.
या कार्निवलला पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने सरकार समाधानी आहे. या काळात हैतीला येणारी विमाने व हॉटेल्स हाउसफुल झाली. पर्यटनमंत्र्यानीही कार्निवलच्या यशावर शिक्कामोर्तब केले. इथून पुढे दर वर्षी जुलै च्या शेवटच्या आठवड्यात शनिवार, रविवार हा महोत्सव आयोजित केला जाईल; अशी घोषणाही त्यांनी केली.