पॉवर ग्रीड कोर्पोरेशनचे कौतुक करा: शिंदे

नवी दिल्ली: निम्म्या देशातील वीज खंडीत झाली म्हणून केवळ टीका करण्यापेक्षा काही तासातच विद्युतपुरवठा सुरळीत करता आला याबद्दल कौतुक करणे आवश्यक आहे; अशी अपेक्षा विद्यमान गृहमंत्री आणि तत्कालीन उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

सोमवारी उत्तर ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने उत्तरेकडील राज्यात वीज पुरवठा खंडीत झाला. या बिघाडाची गाडी रुळावर येण्यापूर्वीच पुन्हा मंगळवारी ग्रीडमध्ये बिघाड होऊन राजधानी दिल्लीसह देशातील १९ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशात वीज गेली. राज्यांनी केंद्राच्या ग्रीडमधून क्षमतेपेक्षा अधिक वीज ओढून घेतल्यामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी याबद्दल नाराजीही व्यक्त केली.

या संपूर्ण वीज संकटाबाबत आपण पंतप्रधान कार्यालयाला अहवाल दिल्याचे सांगून शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की; अमेरिकेतही अशी आपत्ती आल्यावर ४ दिवस वीज आली नव्हती. आमच्या यंत्रणांनी दोषाची कारणे शोधून काही तासात विद्युतपुरवठा सुरळीत केला. खरे तर याबद्दल पॉवर ग्रीड कोर्पोरेशनचे कौतुक व्हायला हवे.

Leave a Comment