मोदीस्तुती नडली

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रसिद्धीचे तंत्रच असे काही आहे की त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होणारा कोणीही त्यांची स्तुती करायला लागतो. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांनी तसे केले आहे. २००२ सालच्या दंगलीत ते बदनाम झाले आहेत म्हणून देशभरातले मुस्लिम लोक त्यांच्यावर कायम संतापलेले आहेत. त्यामुळे मोदी आणि मुस्लिम विरोध यांचे असे काही समीकरण जमलेले आहे की जो कोणी मोदींशी जवळीक करील तो आपोआपच मुस्लिमांचा शत्रू ठरतो. त्यामुळे ज्यांची सत्ता मुस्लिम मतांवर अवलंबून असते असे नेते मोदींशी आपला काही संबंध नाही असे भासवत असतात.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तर आपण मोदींचे कट्टर शत्रू आहोत, असा देखावा उभा केला आहे. मुलायमसिंग यादव यांचाही तोच प्रकार. २००७ साली त्यांनी बाबरी मशीद पाडणारे मुख्यमंत्री कल्याणसिंग यांना जवळ केल्यामुळे उत्तर प्रदेशातले मुस्लिम मतदार त्यांच्यावर एवढे नाराज झाले की, मुलायमसिंगांना नंतरची चार वर्षे एकही निवडणूक जिंकता आली नाही. शेवटी कल्याणसिंगांना दूर केल्यावरच त्यांना या समाजाने पाठिंबा दिला. आता त्यांच्याच पक्षाच्या शाहीद सिद्दीकी या कार्यकर्ता कम पत्रकाराने आपल्या दैनिकात मोदींची मुलाखत छापली. खरे तर मुलाखत छापणे म्हणजे मोदी यांना पाठिंबा देणे नव्हे. उलट अशा मुलाखतीत पत्रकार त्यांना उलट सुलट प्रश्‍न विचारून अडचणीत आणत असतात आणि सिद्दीकी यांनी तसेच केले होते पण मोदी यांनी या अडचणीचे रूपांतर संधीत केले. ही मुलाखत `नई दुनिया’ या उर्दु साप्ताहिकात आली आहे पण, ती ज्यांना उर्दु वाचता येते त्यांनाच कळणार. बाकीच्या लोकांना या मुलाखतीवरून काढण्यात आलेली बातमीच तेवढी वाचनात आली. तिच्यात मोदींनी आपण या दंगलीत दोषी असू तर आपल्याला जाहीर फाशी द्या असे म्हटले होते. लोकांना कळले ते एवढेच होते. पत्रकाराने त्यांना २००२ सालच्या दंगलीबद्दल देशाची माफी मागणार का असा प्रश्‍न केला होता आणि या प्रश्‍नाच्या उत्तरात मोदी यांनी हे विधान केले होते. आपण कोणाची माफी मागणार नाही कारण आपण काही चूक केलेली नाही असे मोदी यांनी म्हटले होते. राजकारणात अशी माफी मागणे हे प्रांजळपणाचे वगैरे मानले जाते; पण माफी मागण्यातून आपण चूक केली आहे असा कबुलीजबाब दिल्यासारखे होत असते. म्हणून मोदींनी माफीस नकार देऊन हिंदूंची मते राखली आणि आपला काही दोष असेल तर तसे सिद्ध करा आणि फासावर चढवा अशी पुस्ती जोडून मुस्लिम मने गोंजारण्याचीही संधी साधली. परिणामी ही मुलाखत म्हणजे मोदी यांना मिळवून दिलेली संधी आहे असे चित्र निर्माण झाले. सारे काही ठरवून केल्याप्रमाणे चालले आहे अशी भावना मुस्लिम समाजात निर्माण झाली. सिद्दीकी यांना खूप खुलासा केला पण त्यांचे काही एक न ऐकता मुलायमसिंग यादव यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले. सिद्दीकींचे म्हणणे खरेही असेल पण त्याला काही महत्त्व नाही. मुस्लिम मतदारांना काय वाटते, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. मोदी यांच्या संबंधात सर्वांनाच असे सावध रहावे लागते.

डॉ. अब्दुल कलाम किंवा कोणा उद्योगपतींनी मोदी यांची स्तुती केली तर तिचे काही राजकीय पडसाद उमटत नाहीत. राजकीय नेत्यांना आणि राजकारण करणार्‍या सन्यासी नेत्यांनाही मोदी यांच्या विषयी बोलताना सावध रहावे लागते. रामदेव बाबांनीही मोदी यांची केवळ स्तुतीच केली असे नाही तर त्यांना दंगलींच्या बाबतीत क्लीन चिट दिली. त्यामुळे अण्णा हजारे आणि बाबा यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. या दोघांनी नुकतेच हातात हात घालून मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार केला होता. पण आता मोदींवरून त्यांच्यात फट पडली आहे. कॉंग्रेसचे खासदार विजय दर्डा असेच अडचणीत आले आहेत. त्यांना गुजरात सरकारने एक पुरस्कार दिला.

त्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना गुजरात का शेर म्हटले आणि संत म्हणून त्यांचा सन्मानही केला. या ठिकाणी त्यांनी सोनिया गांधी यांनाही दुखावले आहे कारण मोदी आणि सोनिया गांधी यांच्यात किती वितुष्ट आहे हे सर्वांना माहीत आहे. मोदी नेहमी सोनिया गांधी यांची निर्भत्सना करीत असतात. पण दर्डा तर मोदींची प्रशंसा करीत आहेत. या गोष्टीने खळबळ माजली पण दर्डा यांनी स्पष्टीकरण केले. आपल्याला मोदी यांनी बोलावले होते आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण, त्यांचा गौरव केला असे त्यांनी म्हटले. मोदी हा विषय किती नाजूक आहे याचा फार तपशीलाने विचार न करता ते बोलले. तसा तो काही फार मोठा अपराध नव्हे कारण ते काही राजकीय व्यासपीठ नव्हते. मात्र हा खुलासाही आता सिद्दीकी प्रमाणेच व्यर्थ ठरणार आहे. ते व्यासपीठ कोणते होते आणि तिथे त्यांनी आपली संस्कृती पाळली आहे की नाही यावर काही तर्कशुद्ध विचार केला जाणार नाही. हा प्रकार घडल्याबरोबर काही मुस्लिम नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तिची दखल कॉंग्रेस पक्षाला घ्यावी लागणार आहे. प्रश्‍न मुस्लिम समाजाच्या मोदींप्रती असलेल्या भावनेचा आहे.

Leave a Comment