दोन महिन्यातच शिल्पाचे पुनरागमन…

प्रेग्नन्सीच्या काळातदेखील ऍक्टिव्ह राहणार्‍या शिल्पाने मे महिन्यात मुलाला जन्म दिला. पती राज कुंद्रा रागवल्यानंतरच तिने आराम केला. आता फक्त दोन महिन्यांची विश्रांती घेऊन ती कमबॅक करत आहे. मात्र तिच्या आधी आई झालेल्या काही अभिनेत्री अजूनही कामात सक्रिय झालेल्या नाहीत.

शिल्पा शेट्टी मुलगा विआनच्या पालनपोषणात मग्न असली तरीदेखील तिने लवकरच कमबॅक करायचे ठरवले आहे. मात्र कमबॅकसाठी शिल्पाने कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. एका डान्स शोच्या माध्यमातून शिल्पाने कमबॅक करायचे ठरवले आहे. एका शोसाठी ती स्पेशल डान्स करणार आहे. या शोची निर्मातीदेखील शिल्पाच आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पाने युकेच्या एका शोचे अधिकार विकत घेतले आहे. तेथील काही टीव्ही शो ती भारतीय प्रेक्षकांसाठी बनवण्याच्या विचारात आहे. राज कुंद्रा यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, भारतात रिऍलिटी शोचे भविष्य उज्ज्वल आहे, असे शिल्पाचे मत आहे.

राजदेखील मॅटर्निटी लिव्हवर
मुलगा विआनच्या जन्मानंतर राज आणि शिल्पाचे आयुष्य बदलले आहे. राज म्हणतात, रात्री आमची पुरेशी झोप होत नाही, विआन चांगला झोपला आहे की नाही हीच चिंता असते. त्यामुळे दोन-तीन वेळेस त्याला उठून पाहावे लागते. विआन आल्याने घरचे आणि बाहेरचे सगळेच वातावरण बदलले आहे. मीदेखील दोन महिन्यापासून मॅटर्निटी लिव्हवर होतो.

आमच्यासाठी भाग्यवान आहे विआन
शिल्पा आणि राज आपल्या मुलाला भाग्यवान असल्याचे म्हणतात. राज म्हणतात, आम्ही जो मिक्सड मार्शियल फाइट लीग कार्यक्रम केला होता, त्याला लवकरच टीव्हीवर आणणार आहोत. हा शो शिल्पाच्या प्रॉडक्शन हाऊसमध्येच तयार होईल. हे सगळे विआनच्या भाग्यामुळेच होत आहे. या शोसाठी मी संजय दत्तसोबत चर्चा केली आहे. तेच शोची ओपनिंग आणि क्लोजिंग करणार आहेत. खरं तर इंडस्ट्रीत माझे खूप मित्र आहेत, पण संजय माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे.

राज कुंद्रादेखील लवकरच छोट्या पडद्यावर
सुपरफाइट लीग (एसएफएल) मधून राज कुंद्रादेखील पदार्पण करत आहेत. राजने सांगितले, या कार्यक्रमात १६ फायटर्स एकत्र राहतील. घरात एक फायटिंग केज असेल, त्यात दर आठवड्याला फाइट होईल आणि हारणारा घराबाहेर जाईल. या कार्यक्रमात राज बिग बॉसप्रमाणे बॅकग्राउंड आवाज देणार आहे.

Leave a Comment