पुणे दि.३० – सर्व जगात लोकप्रिय असणार्या पुणे गणेशोत्सवाचे पडघम आता वाजू लागले असतानाच सुरक्षेचा मोठा प्रश्न पोलिसांना भेडसावतो आहे. मात्र हा उत्सव सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावा यासाठी पोलिस विभागाने पुणे मनपाच्या नगरसेवकांना तसेच आमदारांना केलेल्या आवाहनाला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परिणामी या गणेशोत्सवात जागोजागी आणि विशेषतः संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक सीसीटिव्ही कॅमरे बसविणे शक्य होईल असे सध्या तरी दिसत आहे.
गणेशोत्सव सीसीटिव्ही कॅमेर्यांसाठी नगरसेवकांची आर्थिक मदत
गणेशोत्सव काळात होणारी प्रचंड गर्दी पोलिसांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असते कारण या गर्दीमुळेच अनेकवेळा संशयास्पद हालचाली नजरेतून सुटण्याचा संभव मोठा असतो. त्यासाठी शहरात जागोजागी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता यापूर्वीही व्यक्त केली गेली आहे. पोलिस विभागाने गृहमंत्रालयाशी त्यासंबंधात पत्रव्यवहार केल्याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे मात्र गृहविभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पोलिस विभागाने यंदा महापालिकेत निवडून गेलेले नगरसेवक आणि आमदारांनाच त्यांच्या विकासनिधीतून या कॅमेर्यांसाठी रक्कम देण्याचे आवाहन केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
पोलिसांनी यापूर्वीच पुण्याचे सर्वेक्षण केले असून अत्याधुनिक अमेरिकन इन्फोनोव्हा कॅमेरे बसविण्याच्या जागाही निश्चित केल्या आहेत. पुणे विभागातील सर्व ३३ पोलिस ठाणी कनेक्ट करण्यासाठी किमान १ हजार कॅमेर्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी साधारण तीन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे असे पोलिस उपायुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले. ते म्हणाले की पोलिस विभागाने यासाठी नगरसेवक आणि आमदारांपुढेच मदतीचा प्रस्ताव ठेवला असून शिवाजीनगर भागातील आमदार राष्ट्रवादीचे अनिल शिरोळे यांनी १० लाख रूपये देऊन कार्याची मुहूर्तमेढही रोवली आहे. सीसीटिव्ही कॅमेर्यांसाठी अनुदान गोळा केले जात असून जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासाठी वेगळा विभागही सुरू करण्यात आला असल्याचे समजते.
पुण्याचा गणेशोत्सव हा पुणेकरांच्या अभिमानाचा विषय आहे त्यामुळे हा उत्सव सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे पार पडावा यासाठी नगरसेवकांनीही सहयोग दिला पाहिजे असे मत सनी निम्हण यांनी व्यक्त केले आहे आणि त्यांना उपलब्ध होऊ शकणारा सर्व २० लाखांचा निधी त्यासाठी देण्याची तयारी दर्शविली आहे. स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने ही योजना तडीस जाईल अशी अपेक्षा सर्वच नगरसेवक व्यक्त करत आहेत आणि प्रत्येकी दोन लाख रूपये देणे सहज शक्य असल्याचेही बोलत आहेत. कांही नगरसेवकांनी पोलिस आणि नगरसेवक एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कांही करत आहेत याचा पुणेकरांना नक्कीच आनंद वाटेल असे सांगत आहेत. मनसेचे नगरसेवक राजेंद्र वगसकर यांनीही १० लाख रूपये देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र त्याचबरोबर केवळ गणेशोत्सवापुरतेच नव्हे तर हे कॅमेरे सतत सुरू ठेवावेत आणि त्याच्या देखभालीकडे पोलिस विभागानेच लक्ष पुरवावे अशीही नगरसेवकांची अपेक्षा आहे.
