गेले ४१ दिवस लंडनच्या इक्वेडोर दूतावासात आश्रय घेतलेल्या ज्युलियन असांजेला इक्वेडोरमध्ये राजकीय आश्रय द्यावा अशी विनंती असांजेच्या आई- ख्रिस्टीन यांनी केली असून त्या सध्या याकामासाठीच क्विटो येथे पोहोचल्या आहेत. इक्वेडोअरचे प्रेसिडेंट राफेल कोरियो या बाबत योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षाही ख्रिस्टीन यांनी व्यक्त केली आहे.
असांजेला राजाश्रय द्यावा यासाठी आईची विनंती
बलात्काराचा आरोप असणारा विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याने त्याचे स्वीडनला हस्तांतरण करू नये यासाठी लंडनच्या इक्वेडोर दूतावासात आश्रय घेतला असून आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने केले गेले असल्याचे त्याचे म्हणणे आहे. असांजेने इक्वेडोरमध्ये आश्रय मागितला असून त्याच्या विनंतीवर इक्वेडोर सरकार विचार करत आहे. असांजेची आई ख्रिस्टिना यांनाही असांजेचे स्वीडनला हस्तांतरीत केल्यास त्याला अमेरिकेत पाठविले जाईल आणि तेथे मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाईल अशी भीती वाटते आहे. त्या म्हणतात, सध्या ब्रॅडले मॉनिंगचा तुरूंगात जसा छळ केला जात असे तसाच असांजेचाही केला जाईल. त्यामुळे इक्वेडोर सरकारने त्याच्या आश्रयाच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करावा.
ब्रॅडले मॉनिंग हा अमेरिकेच्या लष्कर गुप्तवार्ता विभागातील विश्लेषक इराकमध्ये काम करत होता व त्यानेच अमेरिकेच्या लष्कर तसेच राज्य विभागातील महत्त्वाची आणि गुप्त कागदपत्रे बाहेर पुरविल्याचा आरोप त्याच्यावर आहे. हीच कागदपत्रे विकिलिक्सवर प्रसिद्ध करण्यात आली होती. मॉनिंगला शत्रूला मदत केल्याच्या तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचविल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून तो दोषी ठरला तर त्याला जन्मठेप होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
