‘राष्ट्रवादी’ला हवी दलितांची साथ

मुंबई: भीमशक्ती, शिवशक्तीच्या महायुतीला रोखण्यासाठी राज्यातल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येउन राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यावी असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

पेंथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दलित बहुजन चेतना परिषदेत ते बोलत होते. सन २०१४च्या लोकसभा निवडणुका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दलित मते आकृष्ट करण्याच्या दृष्टीने पवारांनी हे आवाहन केले. माजी खासदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय रिपब्लिकन पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी २० वर्ष असलेला घरोबा तोडून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेबरोबर महायुती केली आहे. मात्र अनेक दलित नेत्यांना हा निर्णय रुचलेला नाही. अशा दलित नेत्यांना आपल्या प्रभावक्षेत्रात ओढण्याचा प्रयत्न पवार यांनी यावेळी केला.

आंबेडकरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहेमीच प्रयत्नशील राहील; अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी दलित जनतेच्या ११ मागण्यांची सनद पेंथर्सचे अध्यक्ष गंगाधर गाडे यांनी पवार यांच्याकडे सुपूर्द केली. ती पवार यांनी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र अध्यक्ष मधुकर पिचड आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन आहेर यांच्याकडे दिली. हे दोघे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दलितांचे प्रश्न मार्गी लावतील; असे आश्वासनही पवार यांनी दिले.

Leave a Comment