आझमगढ: मायावतींच्या पुतळ्याची विटंबना केलेल्यांना अटक होऊन चोवीस तास उलटण्यापूर्वीच उत्तर प्रदेशात आझमगढ जिल्ह्यातील तीन गावात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून याच्या निषेधार्थ बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल चार तास महामार्गावरील वाहतूक रोखून धरली.
मायावतींच्या पुतळ्यापाठोपाठ घटनाकारांचे पुतळेही फोडले
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मेहनगरमधील करत, जियासाठ यासह आणखी एका गावात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या. या प्रकारामुळे संतप्त झालेले ग्रामस्थ आणि बसपा कार्यकर्त्यांनी महामार्गावर चार तास रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून नवीन पुतळे बसविण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकार्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
