आसाममधील हिंसाचार हा देशाला कलंक: पंतप्रधान

गुवाहाटी: आसाममधील हिंसाचार हा देशाला लागलेला कलंक आहे; असे उद्गार पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढले. आताच्या परिस्थितीत परस्पर विश्वास आणि सामंजस्याची भावना वाढीस लाऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

आसामच्या कोक्राझार या हिंसाग्रस्त जिल्ह्यातील संक्रमण शिबिरांना पंतप्रधानांनी भेट दिली. हिंसाग्रस्त भागाची पाहणी देखील त्यांनी केली. शनिवारी सकाळी गुवाहाटी येथून निघताच पंतप्रधानांच्या हेलिकोप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना परत फिरावे लागले. मात्र दुसऱ्या हेलिकोप्टरमधून त्यांनी हिंसाग्रस्त भागाला भेट दिली. आसामचे राज्यपाल जे.बी. पटनाईक आणि मुख्यमंत्री तरुण गोगोई हे ही पंतप्रधानांबरोबर होते.

केंद्र आणि राज्य शासनाने एकत्र काम सुरू केले असून हिंसाग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील; अशी ग्वाही सिंग यांनी दिली.

कोक्राझार आणि चिरांग जिल्ह्यात बांग्ला निर्वासित आणि स्थानिक आसामी नागरिक यांच्यात उसळलेल्या हिंसाचारात १० दिवसात ५० हून अधिक जण ठार झाले आहेत तर लाखो लोक बेघर झाले आहेत.

आसाममधील हिंसाग्रस्त भागाच्या मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी केंद्र शासन ३०० कोटी रुपयांचा निधी देईल; अशी घोषणा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली.

आसाममधील हिंसाग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान पत्रकारांशी बोलत होते.

हिसाग्रस्त भागांसाठी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये; तर विशेष सहाय्यता योजनेंतर्गत आणखी १०० कोटी रुपये दिले जातील. याशिवाय हिंसाचारात बेघर झालेल्या नागरिकांना इंदिरा आवास योजनेंतर्गत घर उभारणीसाठी १०० कोटी रुपयाची अतिरिक्त तरतूद केली जाईल; असे पंतप्रधानांनी सांगितले. हिंसाचारात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना २ लाख रुपये; जखमींना ३० ते ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.