सध्या पूर्ण भारतामध्ये स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात मोठी वातावरण निर्मिती केली जात आहे आणि ती साहजिक सुद्धा आहे. परंतु लोकांना मुली का नकोशा झाल्या आहेत, यावर खरोखर सर्व अंगांनी प्रकाश पडत नाही असे दिसत आहे. मुलगी नकोशी वाटणे हे लोकांच्या अज्ञानीपणाचे लक्षण आहे ही गोष्ट खरीच आहे. समाजात स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळते आणि त्यांना कमी लेखले जाते. म्हणून लोकांना मुलगी नकोशी वाटते, हीही गोष्ट सत्य आहे. परंतु मुलांच्या आणि मुलींचे प्रमाण हा विषय बराचसा किंबहुना पूर्णपणे कुटुंब नियोजनाशी निगडित आहे. त्यामुळे कुटुंब नियोजनाच्या मुलभूत संकल्पनाच्या बाबतीत काही आपण चूक केली आहे का, याचा जरा विचार केला पाहिजे. स्त्री भ्रूण हत्येची चर्चा सुरू झाल्यानंतर जो एकसुरी प्रचार सुरू आहे त्या प्रचाराच्या गदारोळात या गोष्टीकडे लोकांचे लक्ष गेलेले नाही. पण काही तज़्ज्ञ मात्र या बाबतीत आता बोलायला लागले आहेत. मुला-मुलींच्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या असमतोलाला कुटुंब नियोजनाचा चुकीचा प्रचार हा सुद्धा कारणीभूत आहे, असे मत आता मांडले जात आहे.
या मताची चर्चा करताना भारतातल्या कुटुंब नियोजनाच्या प्रचाराचा थोडा आढावा घेतला पाहिजे. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाच्या लोकसंख्येला पुरेल एवढे धान्य देशात पिकत नव्हते आणि भारत हा एक दरिद्री देश होता. त्यामुळे जे पिकते तेवढे धान्य आहे त्या लोकसंख्येला पुरवायचे असेल, तर लोकसंख्या वाढता कामा नये, असा एक सरधोपट. परंतु कॉमनसेन्सला पटणारा विचार देशात मांडला गेला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासारख्या नेत्यांना मात्र हा विचार मान्य नव्हता. लोकसंख्या कमी झाली म्हणजे देश सुधारतो आणि ती वाढली की देश दरिद्री होतो हे म्हणणे त्यांना पटत नव्हते. त्यांनी धान्य पुरत नसेल तर लोकसंख्या कमी करण्याच्या ऐवजी धान्याचे उत्पादन वाढवले पाहिजे, असे प्रतिपादन केले होते. आज आपण याचा पडताळा घेत आहोत. एकेकाळी भारतात ४० कोटी लोकसंख्येला पुरेल एवढे धान्य पिकत नव्हते, पण आता मात्र १२० कोटी लोकसंख्या झाली तरी तिला पुरून उरेल एवढे धान्य पिकत आहे. तेव्हा लोकसंख्या कमी-जास्त असण्याचा गरिबीशी काही संबंध नाही, हे लक्षात घ्यायला हवे होते. पंडित नेहरू नंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. त्यांनी मात्र ‘दो या तीन बस’ चा नारा लावला.
कुटुंब नियोजन म्हणजे दोन किंवा तीन मुले, अशी समजूत त्यामुळे पक्की झाली. ती एवढी पक्की होती की, एखाद्या दांपत्याला दोन मुले झाली की, सरकारी कोटा पूर्ण झाला असे म्हणण्याची प्रथा रूढ झाली होती. याबाबतीत मनमोहनसिंग यांनी मात्र चांगली कल्पना मांडली आहे. त्यांनी असे म्हटले की, किती मुले असावीत याची संख्या सरकारने सांगू नये. कुटुंबाचे नियोजन केले पाहिजे, ही कल्पना मात्र लोकांना सांगितली पाहिजे. नियोजित पद्धतीने एखाद्याला तीन किंवा चार मुले झाली तर ती काही तरी चूक आहे असे वाटता कामा नये. परंतु `दो या तीन’चा एवढा तगादा होता की, दोन किंवा तीन पेक्षा अधिक मुले असणे हा काही तरी राष्ट्रीय गुन्हा आहे असेच लोकांना वाटायला लागले. हा अतिरेक कमी झाला म्हणून की काय काही राज्य सरकारांनी दोन पेक्षा अधिक मुले असणार्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपात्र ठरवले जाईल, असा कायदाच केला. काही सरकारी नोकर्यांमध्येही सवलतींचा लाभ घेण्यासाठी दोनपेक्षा अधिक मुले नसल्याची अट घातली जाते. सरकारी गृह निर्माण संस्थेमध्ये जागा मिळविण्यासाठी सुद्धा अशी अट आहे. यापुढे जाऊन दोन पेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचा ‘अपराध’ करणार्यांना धरणाचे पाणी देऊ नये, अशी सूचना महाराष्ट्र शासनाने मांडलेली आहे.
केरळमध्ये तर दोन पेक्षा अधिक मुले असणार्यांना तुरुंगात टाकण्याची तरतूद केली जाणार आहे. या सगळ्या शहाण्या लोकांनी दोन किंवा तीन हा आकडा कशातून काढला हे काही समजत नाही. परंतु सरकारी कोटा दोनचाच असेल तर दोन्हीही मुलगेच असलेले बरे, असे लोकांना वाटायला लागले. साधारणपणे एक मुलगा आणि एक मुलगी हा आदर्श संसार समजला जातो. परंतु या आदर्शाप्रमाणे काही लोकांना मुले होत नसतात. काहींना मुलीच होतात, त्यांना मुलगा हवा असतो. परंतु सलग तीन मुली झाल्या आणि मुलासाठी चौथा चान्स घ्यावासा वाटला तर निवडणुकीचे तिकीट मिळणार नाही, पाटाचे पाणी मिळणार नाही, नोकरीत प्रमोशन मिळणार नाही आणि केरळमध्ये तर तुरुंगात जावे लागेल. अशी सगळी भीती तर आहे पण मुलगा तर हवा आहे, मात्र मुलगा होत नाही. अशा परिस्थितीत लोकांना मुलगी नकोशी वाटायला लागली. सरकारने मुलांच्या संख्येच्या बाबतीत अशा अटी घातलेल्या आहेत, परंतु एखाद्याला जर जास्त मुली असतील तर त्यांना अपत्यांच्या संख्येच्या बाबतीतील अट शिथील करावी. म्हणजे लोक मुलींना जन्म देण्याच्या बाबतीत निर्दयीपणा करणार नाहीत. पण एवढीही कल्पकता कोणी दाखवलेली नाही. एखाद्या माणसाला तीन अपत्ये असतील आणि त्यात दोन मुली असतील तर त्याला दोनच अपत्ये आहेत असे समजावे, अशी एक सूट द्यायला हवी होती.