हाँगकाँग दि.२४ – सोमवारी मध्यरात्रीनंतर हाँगकाँगला व्हिसेंटी नावाच्या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. १४० किमी वेगाने वाहणार्या वार्यांबरोबरच मुसळधार पाऊसही कोसळल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली. या तडाख्यात शेकडो लोक जखमी झाले, हजारो झाडे भुईसपाट झाली तर अनेक फलाईटस रद्द कराव्या लागल्या असे सांगण्यात आले. मंगळवारी सकाळीही जोरदार वारे वाहण्याचा ईशारा हाँगकाँग वेधशाळेने दिला असून शेअर बाजारातील व्यवहारही ठप्प झाले आहेत. मंगळवारी दुपारपासून हे व्यवहार पुन्हा सुरू होतील असे समजते.
या वादळाची सूचना अगोदरच देण्यात आली होती आणि तेरा वर्षात प्रथमच या वादळाची तीव्रता लेव्हल १० वर असेल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. सोमवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या वादळामुळे हजारो झाडे पडली. चार ते ८६ वयोगटातील १०० हून अधिक जखमी लोकांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडले गेले तर ७६ जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे हाँगकाँगच्या कांही भागात पूर आला आहे. सरकारने २४ ताप्तुरते निवारे सुरू केले असून त्यात सुमारे २५० लोकांनी आश्रय घेतला आहे.
विमानतळ अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्रीपासून ६० उड्डाणे रद्द करण्यात आली, ६० उड्डाणे नियोजित वेळेपेक्षा उशीरा झाली तर १६ उड्डाणे अन्यत्र वळविण्यात आली आहेत.