नवी दिल्ली: अमरनाथ यात्रेकरूंच्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाने यात्रामार्गावर वैद्यकीय पथके तैनात करण्याचे आदेश जम्मी- काश्मीर राज्यशासनाला दिले आहेत. केंद्र आणि जवळच्या राज्य शासनाने राज्याला आवश्यक की वैद्यकीय साधनसामुग्री उपलब्ध करून द्यावी; असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
अमरनाथ यात्रेकरूंच्या मृत्यूबाबत सर्वोच्च न्यायालयाला चिंता
अमरनाथ यात्रेकरूंच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याच्या वृत्ताची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दाखल घेऊन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. तरीही मागील ३ दिवसात आणखी तेरा भाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. यावर्षी यात्रा सुरू झाल्यापासून ९७ जणांचा मृत्यू झाला आहे.
खडतर मार्ग, प्रतिकूल हवामान, नैसर्गिक आपत्ती यामुळे अनेकदा भाविकांना शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागते. वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध न झाल्यास मृत्यू ही ओढवतो. यावर्षी मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने उपलब्ध वैद्यकीय सुविधांची पाहणी आवश्यक उपाय यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीरच्या राज्यापांच्या नेतृत्वाखाली उच्चाधिकार समितीही नियुक्त केली असून ही समिती लवकरंच यात्रामार्गाचा दौरा करेल; असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. बी.एस.चौहान आणि न्या. स्वतंत्र कुमार यांनी म्हटले आहे.
