चव्हाणांचे आसन धोक्यात ?

शरदराव पवार यांचा संपुआघाडीत बंड करण्यामागे नेमका काय हेतू आहे, यावर महाराष्ट्रातले राजकीय विश्‍लेषक चर्चा करून थकले आहेत. पण त्यातल्या कोणाला तरी पवारांचे हे बंड नेमके कशासाठी आहे याचा पत्ता लागला आहे की नाही असा प्रश्‍न पडतो. कारण पवारांचे राजकारण फार गहन असते. फसवे असते आणि अनेकांना चकवणारेही असते. पवारांनी मंत्रिमंडळातल्या क्रमांक दोनवर दावा सांगण्यासाठी,  प्रफुल्ल पटेल यांना अधिक प्रभावी खाते मिळावे यासाठी, तसेच सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदासाठी व्यासपीठ तयार करण्यासाठी हा सारा प्रकार केला आहे असे म्हटले जात आहे. तसे विश्‍लेषणही करण्यात येत आहे. काही लोकांच्या मते पवारांचा या गडबडीमागे महाराष्ट्रात सत्तापालट घडवण्याचाही हेतू आहे. त्यांनी राजीनाम्याची आवई उठवल्यानंतर दोन दिवसांनी तसा मुद्दा उपस्थितही केला आहे. महाराष्ट्रात सरकार काम करीत नाही, मुख्यमंत्र्यांना ठाकरे बंधूंच्या पी.ए.ला भेटायला सवड आहे पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटायल वेळ नाही, राष्ट्रवादीची कामे होत नाहीत असा पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या  गार्‍हाण्यांचा पाढा वाचला आहे. हे सगळे सुरू असतानाच अजित पवारांनीही महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या सोबत राहण्यात काही अर्थ नाही असे म्हणून कळस केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने केन्द्रातल्या आघाडीतून बाहेर पडायचे ठरवले तर  केन्द्रातले सरकार काही कोसळणार नाही पण त्याचा परिणाम होऊन राज्यातले सरकार नक्कीच कोसळेल. या कोसळण्या मागची कारणे खरी कोणती आणि दाखवायची कोणती याचा तपास नंतर करता येईल पण राष्ट्रवादीची विधानसभेतली आमदारांची संख्या निर्णायक असल्यामुळे त्यांनी सरकारचा आधार काढून घेताच ते सरकार नक्कीच पडणार आहे.

हे आघाडी सरकार गेल्या १३ वर्षांपासून सत्तेवर आहे. त्यातले हे दोन पक्ष सतत भांडत असतात. त्यांच्या भांडणाचा साधारण विषय हा विविध योजनांचे श्रेय घेणे हा असतो. कारण एखादी योजना राबवली जाते तेव्हा तिचे रूपांतर मतांत होणार असेल तर ती मते कोणाला मिळावीत याची अहमहमिका या दोन पक्षांत असते.  ते सतत असे भांडतच राज्य करीत आले आहेत. त्यांनी वरकरणी हातात हात घेतले असले तरीही आतून ते एकमेकांवर कडी करण्याचा प्रयत्न करीत असतात.  परस्परांचे खच्चीकरण करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न जारी असतो. मग राष्ट्रवादीचे नेते, वेळ पडल्यास आम्ही बाहेर पडू, वगैरे धमक्या देतात पण दोन्ही पक्षांचे नेते सत्तेशिवाय जगू शकणार नाहीत हे दोघांनाही माहीत असल्यामुळे कोणीच बाहेर पडत नाही. सतत भांडणार्‍या पण तरीही नांदणार्‍या पती पत्नीप्रमाणे हे सारे चाललेले असते. आता मात्र राष्ट्रवादीने काडी मोडण्याच्याच गोष्टी सुरू केल्या आहेत. आता नांदणूक कायमची मोडायची वेळ का आली ? याचे कारण आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. त्यांनी भ्रष्टाचाराच्या संबंधात टोकाची भूमिका घेतली आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते होरपळून निघणार आहेत. महाराष्ट्रात आता एक प्रकार जारी आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर आणि आघाडीवर आरोप करीत आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करीत आहेत आणि मुख्यमंत्री  अशी प्रकरणे दडपण्याऐवजी चक्क चौकशा करीत आहेत.  आपण भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाता कामा नये असा त्यांचा प्रयत्न आहे. पाटबंधारे खात्यातल्या भ्रष्टाचारावर तर त्यांनी श्‍वेतपत्रिका काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. ती निघाली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोणकोणत्या नेत्याच्या तोंडाला काळे फासले जाईल याचा काही नेम नाही. मुख्यमंत्र्यांनी श्‍वेतपत्रिका काढू नये असा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी करून पाहिला.

पाटबंधारे मंत्री सुनील तटकरे यांनी पाटबंधारे प्रकल्पाचे काम किती व्यवस्थित चालले आहे याचा स्लाईड शो दाखवला पण मुख्यमंत्र्यांनी श्‍वेतपत्रिका काढणारच असे म्हटले. त्यांचा निर्धार राष्ट्रवादीच्या नेत्यांना मानवणारा नाही. ही श्‍वेतपत्रिका कदाचित १९९५ साल प्रमाणे पवारांच्या विरोधात करावयाच्या प्रचाराचा मुद्दा म्हणून विरोधकांच्या हातात जाऊ शकतो. म्हणून शेवटी मुख्यमंत्र्यांचे आसन अस्थिर करण्याचा शेवटचा निर्वाणीचा मार्ग पवारांनी अवलंबिला आहे.  आता या प्रकरणात तडजोड होईल आणि झाले गेले विसरून सारे कामाला लागतील पण नंतर मुख्यमंत्री श्‍वेत पत्रिकेतला `श्‍वे’ सुद्धा उच्चारणार नाहीत. तसे झाल्यास पवारांचे हे बंड श्‍वेतपत्रिका रद्द करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग होता असे खुशाल समजावे. पवारांनी सोनिया गांधी यांना तसे म्हटलेही असेल. असो पण पवारांची ही खेळी अन्यही काही कारणांनी असल्याचेही काही संकेत मिळत आहेत. या  निमित्ताने पवारांना आपली शेतकरी मतपेढीही मजबूत करायची आहे.  कारण सरकार स्वस्त धान्याची योजना सुरू करण्याच्या विचारात आहे. ती शेतकर्‍यांच्या हिताच्या विरोधात आहे असे पवारांना वाटते. त्यांनी तसे वातावरण तयार केले आहे. आता पवारांनी या योजनेला विरोध असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत ही पुढच्या निवडणुकीची तयारीही आहे.

Leave a Comment