ऐश्वर्या रॉयचे हॉलीवूड चित्रपटातून पुनरागमन?

बाळंतपणातून उठल्यानंतर आणि दीर्घ काळ विश्रांती घेतल्यानंतर आपल्या ऐश्वर्या रॉयने चित्रपट सृष्टीत पुनरागमन करण्यासाठी बॉलीवूड ऐवजी हॉलीवुडचा चित्रपट स्वीकारला असल्याचे समजते.

ऐश्वर्याला आई होऊन आठ महिन्यापेक्षा अधिक कालवधी लोटला आहे. ती पुन्हा बॉलीवूडमध्ये काम करणार की नाही यावरून उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत होत्या. मात्र बॉलीवूड नाही तरी हॉलीवुडमधील एका थ्रीलर चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेऊन तिने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. टायटेनिक फेम स्टार बेली जेन सोबत ऐश्वर्या काम करणार आहे.

या चित्रपटासाठी ऐश्वर्याशी दिग्दर्शक डेनियल सिल्वा यांनी संपर्क साधला असल्याचे समजते. या चित्रपटात गायक लकी अली आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सराह खानही भूमिका करणार आहे. या वृत्ताला सराह खान यांनी दुजोरा दिला आहे. मात्र ऐश्वर्याने अजून पक्का होकार दिलेला नाही. आपले बाळ आराध्याला सोडून शुटींग करण्याच्या मनस्थितीत ती नाही असे सांगण्यात येत आहे. मात्र ऐश्वर्याला पुन्हा अभिनय ही करायचा आहे. तेव्हा सध्या मुलगी का चित्रपट अश्या द्विधा अवस्थेत ती सापडली आहे.