राजकारणापलीकडे…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यात गेल्या सात वर्षांपासून बराच दुरावा निर्माण झाला आहे. हे केवळ दोन भिन्न पक्ष नाहीत तर परस्परविरोधी पक्ष आहेत. कारण शिवसेनेत फूट पडूनच मनसे पक्ष निर्माण झालेला आहे आणि मनसेची निर्मिती झाल्यापासून या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी परस्परांना टोमणे मारणे, ठाकरी शैलीत परस्परांचे वाभाडे काढणे, एवढेच नव्हे तर परस्परांवर ष्टाचाराचे आरोप करणे असेही प्रकार केलेले आहेत.

कधी तरी मधूनच हे दोन पक्ष एकत्र येतील का, अशीही चर्चा उद्भवते. एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर बसले होते. तेव्हा त्यातून त्यांची एक होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी चर्चा सक्रियपणे सुरू झाली होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तर परस्परांवरील टीकेतून निर्माण होणार्‍या कटुतेने अगदी खालची पातळी गाठली होती. मनसेने नुकतेच टोल नाक्यांना लक्ष्य केले. तेव्हा बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही हे टोल नाक्यावरची मोहीम हप्ते वसुलीसाठी आहे, असा उघड आरोप केला. हे तर झाले राजकारण.

पण शेवटी ठाकरे हे परस्परांचे बंधू आहेत आणि राजकारणामुळे त्यांच्यात अंतराय निर्माण झाला असला तरी रक्ताचे नाते काही तुटत नसते. शेवटी रक्ताचे नाते हे निसर्गाने निर्माण केलेले असते. म्हणूनच उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती मिळताच राज ठाकरे यांच्या रक्ताच्या नात्याने त्यांना हाक दिली आणि राजकारणातली सारी कटुता विसरून त्यांनी अलिबागकडे चाललेली आपली गाडी वळवून लिलावती रुग्णालयाकडे नेली. तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

उद्धव ठाकरे यांच्या रक्तवाहिन्यां-मध्ये तीन ब्लॉक्स् निर्माण झाल्यामुळे त्यांना दम लागत होता. त्यामुळे अँजिओग्राफी करून त्यांच्या या ब्लॉकेजचे निदान करण्यात आले. राजकारणाच्या धबडग्यात वावरणार्‍यांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ आणि उसंत नसते. त्यांना उसंत नसली तरी सतत होणार्‍या धावपळीने शरीरामध्ये होणारे बदल काही टळत नाही. कधी ना कधी शरीर त्यांना इशारा देते. राजकीय नेत्यांच्या आयुष्यामध्ये हे अपरिहार्य आहे. राजकारणातली धावपळ, दगदग या सगळ्यातूनही आपली प्रकृती उत्तम राखणारे नेते फार विरळ आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तर पक्षाची मोठी जबाबदारी पडलेली आहे. ती यशस्वीरित्या पार पाडली जावी यासाठी ते प्रचंड धावपळ सुद्धा करत आहेत.

राज ठाकरे हे सुद्धा आपला मनसे हा पक्ष एकहाती पुढे नेत आहेत. त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय वितुष्ट असले तरी कधी तरी त्यांना आपला हा ज्येष्ठ बंधू किंवा दादू याला किती धडपड करावी लागते, असे वाटून गेलेच असणार आणि म्हणून हा आपला मोठा भाऊ रुग्णालयात दाखल झाला आहे हे कळताच राज ठाकरे यांनी तिथे धाव घेतली. उद्धव ठाकरे यांच्या रक्तवाहिन्या-तील दोष अँजिओग्राफीमध्ये निश्‍चित झाला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करून हा दोष काढण्याचा सल्ला दिला. अँजिओप्लास्टी हा उपचार बायपास सर्जरीपेक्षा सोपा असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बायपास सर्जरीला नकार दिला आणि येत्या दोन-तीन दिवसात अँजिओप्लास्टी करून घेण्याची तयारी दाखवली.

अँजिओप्लास्टी या उपचारामध्ये रक्तवाहिन्यातील चरबीच्या गुठळ्या छोटासा स्फोट करून नष्ट केल्या जातात आणि रक्तप्रवास सुरळीत होतो. बायपास सर्जरीला हा एक चांगला पर्याय आहे. अँजिओग्राफीचे तपासणी संपल्यानंतर उद्धव ठाकरे घरी निघाले तेव्हा त्यांना राज ठाकरे यांनी आपल्या गाडीत बसवून स्वत: गाडी चालवत घरापर्यंत नेले. त्यामुळे दोन बंधू संकटाच्या प्रसंगात राजकीय वैर विसरून कसे रक्ताच्या नात्याने जवळ येऊ शकतात हे दिसून आले. शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यासाठी हा सारा प्रसंग विलक्षण भारावून टाकणारा होता. राजकारणामध्ये कितीही मतभेद असले तरी ते मतभेद क्षणभर बाजूला ठेवून नात्यांनी किंवा समान छंदांनी राजकीय नेत्यांनी एकमेकांच्या जवळ आले पाहिजे. यात खरी माणुसकी आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि समाजवादी नेते मधु दंडवते हे दोघेही विचारांच्या बाबतीत परस्परविरोधी परंतु कविता हा दोघांचाही वीकपॉईंट होता. त्यामुळे दोघांनाही कविता ऐकाव्या किंवा ऐकवाव्याशा वाटल्या की, राजकीय मतभेद बाजूला ठेवून दोघेही एकत्र येत असत आणि तिथे सारे मतभेद बाजूला ठेवून काव्याची मैफील रंगत असे. सध्या राजकारणामध्ये शरद पवार यांच्या बाबतीत असे सांगितले जाते की, त्यांचे कोणाशी कितीही मतभेद असले तरी सर्वांशी मैत्री मात्र छान जमते. अर्थात, त्यासाठी अनेक छंदही असावे लागतात आणि छंदांमधून राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जोडता येत असते. इथे ठाकरे बंधू तर फोटोग्राफी, चित्रकला अशा अनेक छंदाबाबत प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय रक्ताचे नाते आहेच. रक्ताच्या नात्यात म्हणजे भाऊकीच्या भांडणात तर आपल्या परंपरेनेच, दु:खाच्या आणि आनंदाच्या प्रसंगात भांडण दूर ठेवावे असे सांगितलेलेच आहे.

Leave a Comment