विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध

पुणे, दि. १४  – विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ११ जागांसाठी ११ अर्जच आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर दि. १८ रोजी या आमदारांची नावे अधिकृतरित्या घोषित करण्यात येतील.    

राष्ट्रवादी काँग्रेसने जयदेव गायकवाड, अमरसिंह पंडीत आणि नरेंद्र पाटील यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी जागा मोकळी करून देणारे संजय दत्त यांचे काँग्रेसने उमेदवारी देऊन पुनर्वसन केले आहे. त्यांच्यासह कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांचे समर्थक शरद रणपिसे यांना विधान परिषदेत स्थान मिळणार आहे.

चौथी जागा लढविण्याच्या मोहात न पडता उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार या कट्टर देशमुख समर्थकाचा पत्ता मात्र मुख्यमंत्र्यांनी कापला आहे. शिवसेनेचे अनिल परब आणि विनायक राऊत, तर भाजपचे विजय गिरकर यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील या विधान परिषदेत दिसतील.

Leave a Comment