महिलांबाबत अनुदारता

कोलकत्त्याची धावपटू पिंकी प्रामाणिक हिच्यावर इतका वाईट प्रसंग गुदरलेला आहे की, आपल्या शत्रूवर सुद्धा असा प्रसंग येऊ नये, असा कोणताही संवेदनशील माणूस म्हणेल. पिंकी प्रामाणिक ही जगप्रसिद्ध धावपटू आहे. तिने यापूर्वीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेले आहे. अशा खेळाडूंच्याविषयी आपले सरकार आता थोडेसे उदार झालेले आहे. त्यामुळे पिंकी प्रामाणिक या २६ वर्षे वयाच्या धावपटूला रेल्वेत नोकरी देण्यात आली. ती तिकीट तपासणीस म्हणून रेल्वेत नोकरी करते. तिच्या हातात चार पैसे खेळत आहेत. ग्रामीण भागातली सामान्य कुटुंबातली मुलगी एका खेड्यातून पुढे आलेली आहे. तिलकडीह हे तिचे गाव. कोलकत्त्यापासून ३०० कि.मी. अंतरावर आहे. आपल्याकडे चार पैसे असल्यामुळे तिने आपल्या परिचयातल्या एका मुलीला शिक्षणासाठी मदत करण्याच्या हेतूने आपल्या खोलीवर रहायला जागा दिली आणि आश्रय दिला. मात्र हा आश्रय पिंकीला महागात पडला.

आश्रय घेतलेली मुलगी पिंकीवरच उलटली. पिंकी ही मुलगी नसून मुलगा आहे आणि तिने आपल्याला आश्रय देऊन आपल्यावर सतत बलात्कार केला, असा आरोप या तरुणीने केला. पोलिसात तशी फिर्याद सुद्धा नोंदली. पोलिसांना तर काय अशी विचित्र फिर्याद हाताळताना भलताच उन्माद येतो. आपल्या समाजामध्ये एखादी व्यक्ती पुरुष आहे का स्त्री आहे, याला किती महत्व दिले जाते हे आपण जाणतोच. परंतु वयाच्या २६ व्या वर्षापर्यंत मुलगी म्हणून लहानाची मोठी झालेली, महिलांच्या स्पर्धात भाग घेऊन आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक मिळवलेली आणि रेल्वेत महिला तिकीट तपासणीस म्हणून काम करणारी ही पिंकी प्रामाणिक मुलगी नसून मुलगा आहे असा विचित्र आरोप कोणी केल्यास त्याने किती मोठा मानसिक धक्का तिला, तिच्या कुटुंबाला बसला असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. समाजाला तर एक वेगळ्या प्रकारचा धक्का बसलाच.

बलात्काराचा प्रकार म्हटल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब दखल घेतली आणि पिंकी प्रामाणिकला अटक केली. तिच्यावर मुलगा असल्याचा आरोप करण्यात आला होता. ती मुलगी नसून मुलगा आहे हे काही सिद्ध झालेले नव्हते. पण पोलिसांनी अटक केल्यानंतर तिला स्वत:च्या अधिकारातच मुलगा ठरवून टाकले आणि पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तिला पुरुषांच्या वॉर्डमध्ये ठेवले. गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक पुरुष ज्या वॉर्डामध्ये कोंडलेले आहेत त्यांच्या समवेत एका मुलीला काही रात्री काढाव्या लागल्या. तिची अवस्था काय झाली असेल? याचा विचार पोलिसांनी केला नाही. न्यायालयाने सुद्धा या घटनेचा संवेदनशीलतेने विचार करून तिच्या बाबतीत काही वेगळ्या व्यवस्था कराव्यात, असे म्हटले नाही. पिंकी प्रामाणिकला गुन्हेगारी प्रवृत्तींच्या पुरुषांच्या सोबत एकट्याने बंद कोठडीत रहावे लागले. तिचा काय गुन्हा होता? ती बाई नसून पुरुष आहे असा आरोप झाला हा काही तिचा दोष नव्हे. पण शिक्षा मात्र तिला भोगावी लागली. आता अशा प्रकारची एक केस आपल्या हातात येत आहे म्हटल्यानंतर पोलिसांची विकृत बुद्धी जागृत झाली आणि तिची लिंगचाचणी करण्याच्या निमित्ताने तिच्यावर अनन्वीत अत्याचार करण्यात आले.

भारतामध्ये महिलांची अवहेलना करण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. परंतु पिंकी प्रामाणिकचे हे प्रकरण भारताच्या इतिहासामध्ये या देशाच्या संस्कृतीवर प्रचंड मोठे लांछन ठरावे असे घडलेले आहे. या प्रकाराला तोड नाही. दुर्दैवाची बाब अशी की, हा सगळा प्रकार घडून गेल्यानंतर १५ दिवसांनी तिच्या घरात आश्रयाला राहिलेल्या त्या तरुणीने आपण दिलेली बलात्काराची फिर्याद खोटी असल्याची कबुली दिली आहे. पिंकी प्रामाणिकने आपल्याला आश्रय दिला होता, परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या एका नेत्याच्या सांगण्यावरून आपण तिच्यावर हा खोटा आळ घेतला, असे तिने आता कबूल केले आहे. पिंकी प्रामाणिकला खेळाडू म्हणून मिळालेल्या यशाप्रित्यर्थ पश्‍चिम बंगाल सरकारने तिला एक भूखंड बक्षीस दिला होता आणि हा भूखंड त्या मार्क्सवादी नेत्याला हवा होता. त्यावरून पिंकी आणि तो नेता यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता आणि त्यातून पिंकीचा बदला घेण्यासाठी सदर माकपा नेत्याने या तरुणीला पिंकीवर असा खोटा आरोप लावण्यास चिथावले. त्यातून हा सारा प्रकार घडला, असे या मुलीने आता कबूल केले आहे.

हे सगळे नाटक पाहिल्यानंतर मनात किती तरी प्रश्‍न निर्माण होतात. जी मुलगी २६ व्या वर्षापर्यंत मुलगी म्हणून जगते ती मुलगा आहे असा विचित्र आरोप तिच्यावर होतो तेव्हा या आरोपाचे वेगळेपण लक्षात घेऊन हे सारे प्रकरण थोडे शहाणपणाने हाताळावे असे पोलिसांना वाटले नाही. यामधून त्यांच्या पेचप्रसंग हाताळण्याच्या क्षमतेचे दैन्य उघड झाले आहे. न्यायालयाने सुद्धा या प्रकरणात पोलिसांना चांगले मार्गदर्शन मिळेल अशा काही सूचना दिलेल्या नाहीत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये कदाचित कोणाची तरी फूस असू शकेल, अशी शक्यता पडताळून पहावी किंवा आरोपी म्हणून समोर उभ्या असलेल्या पिंकीला पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यापेक्षा एखाद्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी म्हणून दाखल करावे आणि पाहिजे तर तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवावा असा शहाणपणाचा मार्ग कोणालाच का सुचला नसेल, याचे वैषम्य वाटते. मुळात पिंकी प्रामाणिक ही काही अट्टल दरोडेखोर नाही, ही काही सराईत गुन्हेगार सुद्धा नाही. मग तिला पोलीस कोठडीत ठेवण्याचा अट्टाहास का केला गेला याचेच आश्‍चर्य वाटते. त्यातल्या त्यात देशाचा अभिमान ठरलेली, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेली खेळाडू म्हणून तिच्या बाबतीत थोडे माणुसकीने वागायला हवे होते.