अन्सारी यांना संधी

राष्ट्रपतीपदाच्या पाठोपाठ उपराष्ट्रपतीपदाचीही निवडणूक होत आहे. सध्या या पदावर काम करीत असलेले डॉ. हमीद अन्सारी यांची मुदत १० ऑगस्टला संपणार आहे. यूपीए आघाडीचे या पदासाठीचे उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची घोषणा करण्यात आली आहे. बहुमत त्यांच्या मागे आहे. ते सत्ताधारी आघाडीचे उमेदवार असल्यामुळे ते निवडून येण्याची दाट शक्यता आहे. येत्या १० ऑगस्टला त्यांची पहिली कारकीर्द संपणार असून लगेच त्यांचीच दुसरी कारकीर्द सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. खरे तर सोनिया गांधी यांच्या मनात हमीद अन्सारी यांनाच उपराष्ट्रपतीपदावरून बढती देऊन राष्ट्रपती करायची इच्छा होती कारण त्या अजूनही प्रणव मुखर्जी यांच्यावर विश्‍वास ठेवायला तयार नाहीत. म्हणून त्यांनी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीत यावर चर्चा करताना केवळ प्रणव मुखजीं यांच्या नावाची चर्चा केली नव्हती, तर त्याच्यासोबत हमीद अन्सारी यांच्या नावाचाही प्रस्ताव ठेवला होता.

त्यामुळे प्रणव मुखर्जी चिडले होते आणि आपल्या नावासोबत उगाच कोणाच्या नावाची चर्चा होत असेल तर  आपण अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सरकारच्या बाहेर पडू अशी धमकीही दिली होती. तिची मात्र लागू पडून मग सोनिया गांधी यांना केवळ प्रणव मुखर्जी हेच आपल्या संपुआघाडीचे उमेदवार आहेत असे जाहीर करावे लागले.हमीद अन्सारी यांच्या नावाचा प्रस्ताव त्यांना मागे ठेवावा लागला. आता त्यांनी ती कसर भरून काढीत हमीद अन्सारी यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले आहे. त्यांच्या विरोधातला भाजपा प्रणित एनडीए आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. ही आघाडी आपला उमेदवार मैदानात उतरवणार आहेच. कारण एनडीए ची या निवडणुकीतली स्थिती काही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसारखी वाईट नाही. या दोन पदांसाठी होणारी निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. राष्ट्रपतींच्या निवडीसाठी देशातल्या सर्व विधानसभा आणि विधानपरिषदांतले आमदार आणि सारे खासदार मतदान करीत असतात. 

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक तेवढी व्यापक आणि गुंतागुंतीची नसते. या पदासाठी लोकसभेतले ५४३ आणि राज्यसभेतले २४३ असे  ७८६ खासदार मतदान करीत असतात. त्यामुळे निवडणूक सोपी असते पण यावेळी ती सत्ताधारी कॉंग्रेस पक्षासाठी थोडी अवघड आहे. कॉंग्रेसच्या हातात बहुमत नाही. लोकसभेत काठावर बहुमत आहे पण राज्यसभेत कॉंग्रेसकडे २४३ पैकी १०६ असे अल्पमत आहे. त्यामुळे संपुआघाडी म्हणून किंवा केवळ कॉंग्रेस म्हणून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला मनमानी करता येत नाही.  कॉंग्रेसला या बाबतीत आपल्या मित्रपक्षांना तर विश्‍वासात घ्यावेच लागेल पण बसपा, सपा आणि  लोकजनशक्ती या बाहेरून पाठिंबा देणार्‍या सहानुभूतिदार पक्षांनाही विश्‍वासात घ्यावे लागणार आहे. विजयी उमेदवाराला ३९३ मते मिळवावी लागणार आहेत. संपुआघाडीच्या हातात आता ३७८ मते आहेत. त्यातलीही ममता बॅनर्जी यांची २८ मते बेभरवशाची आहेत. शरद पवार यांनी एम.एस. स्वामीनाथन यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यांना अन्सारींची उमेदवारी मान्य नव्हती. त्यामुळे ही उमेदवारी जाहीर करण्याच्या बैठकीला राष्ट्रवादीचा प्रतिनिधी हजर नव्हता. नंतर  पवारांनी अन्सारी यांना पाठींबा जाहीर केला. आधी मात्र कॉंग्रेसच्या नेत्यांना बरीच जमवाजमव करण्याची आवश्यकता वाटायला लागली होती. समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग आपल्या भावासाठी प्रयत्न करीत होते. तर ममता बनर्जी यांना अन्सारी यांच्या ऐवजी गोपाळकृष्ण गांधी हवे होते. अशा स्थितीत बसपाची ३६ मते आणि सपाची ३० मते अन्सारी यांना निवडून आणण्यासाठी निर्णायक ठरणार हे नक्की होते. सोनिया गांधी यांनी या दोन पक्षांची समजूत काढली असून अन्सारी निवडून येतील अशी सोय झाली आहे. यूपीएच्या ३७८ मतांतून तृणमूलची २८ मते गेली तर खाली ३५० उरतात आणि बहुमतासाठी ४३ मतांची गरज पडते. आता सपा आणि बसपा यांच्या ६३ मतांची सोय झाली आहे.  तेव्हा आवश्यकतेपेक्षा २० मते अधिक हातात आहेत.

सोनिया गांधी आता अन्सारी यांच्या निवडीबाबत आश्‍वस्त झाल्या आहेत. पण एनडीएच्या हालचाली सुरूच आहेत. या आघाडीत उमेदवाराबाबत एकमत होत नाही. त्याबाबत भाजपा आणि जनता दल (ए) यांना महत्त्व आहे. अजून तरी उमेदवार कोण असावा याबाबत काही सूर उमटलेले नाहीत पण भाजपाचे नेते आणि माजी संरक्षणमंत्री जसवंतसिंग यांचे प्रयत्न जारी आहेत.  त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही अजून भाजपाच्या नेत्यांनीच त्यांच्या नावाला दुजोरा दिलेला नाही. अर्थात हमीद अन्सारी यांच्या मागे आता बहुमत जमा होण्याची खात्री झाल्यामुळे एनडीएच्या उमेदवाराला काही महत्त्व उरलेले नाही. डॉ. अन्सारी हे सलग दोनदा उपराष्ट्रपती होणारे दुसरे नेते ठरणार आहेत. या पूर्वी हा मान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना १९५२ ते १९६२ या काळात मिळाला होता.  हा एक प्रकारचा आगळा वेगळा बहुमान आहे.

Leave a Comment