अण्णा हजारे -रामदेव बाबा पुण्यात एका व्यासपीठावर

पुणे दि.१६- भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि स्वाभिमान भारत संघटनेचे प्रणेते योगगुरू रामदेव बाबा मंगळवारी एका व्यासपीठावर येत असून भोसरीतील अंकुश लांडगे नाट्यगृहात हा कार्यक्रम होत आहे. नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी दिल्लीत करण्यात येणार्‍या निदर्शनासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यात हजारे आणि रामदेवबाबा १ हजार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

अण्णा आणि रामदेवबाबा यापूर्वी अनेकवार भेटले असले तरी पुण्यात त्यांची ही पहिलीच भेट आहे. जनलोकपाल आंदोलनासाठी अण्णा प्रयत्नशील आहेत तर रामदेवबाबा काळा पैसा परत आणण्यासाठी आंदोलन करत आहेत. या दोघांनी या आंदोलनांसाठी एकत्र येण्याचा निर्णय पूर्वीच जाहीर केला आहे. मंगळवारी अण्णा व रामदेवबाबा एकाच व्यासपीठावर येतील असे अण्णांचे राळेगणमधील सचिव दत्ता आवारी यांनीही स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमाला १६ जिल्ह्यातले १ हजार कार्यकर्ते येणार असून हे सर्व दिल्लीतील आंदोलनातही सहभागी होणार आहेत असेही त्यांनी सागितले.

मंगळवारी रात्री आठ वाजता रामदेवबाबा त्यांच्या काळा पैसा परत आणण्याच्या आंदोलनाला पाठिंबा मिळविण्यासाठी मुंबईत मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही भेटणार आहेत. या महिनाअखेर ते मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार आणि भाजपचे नितीन गडकरी यांचीही भेट घेऊन पाठिंबा मागितला आहे. तसेच शेतकरी संघटनाही रामदेवबाबांना या आंदोलनात पाठिबा देण्याची शक्यता आहे असे भारत स्वाभिमान ट्रस्टच्या नेत्यांनी सांगितले. ट्रस्टने या पूर्वीच सर्व खासदारांच्या सह्या घेण्याची मोहिम सुरू केली असून त्यावर भाजपचे प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर यांनी सह्या केल्या आहेत. पुण्याचे खासदार सुरेश कलमाडीही सही देणार आहेत तर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनाही सही देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

भारत स्वाभिमान संघटनेने ९ ऑगस्टच्या दिल्लीतील आंदोलनासाठी पुणे दिल्ली रेल्वेची ३००तिकीटे बुक केली असून ज्यांना आंदोलनात यायचे आहे पण पैसे नाहीत अशांना ही तिकीटे निम्म्या किंमतीत म्हणजे १००० रूपयांचे तिकीट ५०० रूपयांत दिली जाणार आहेत असेही समजते.

Leave a Comment