उपराष्ट्रपतीपदी अन्सारी यांची सलग दुसर्यांदा वर्णी लागणार

नवी दिल्ली, दि. १५ –  उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना उपराष्ट्रपती पदासाठी पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय यूपीएने घेतला असून, त्यामुळे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतर सलग उपराष्ट्रपती पदावर सलग दुसर्यांदा विराजमान होण्याची संधी त्यांना मिळू शकणार आहे.

राष्ट्रपती पदासाठीही अन्सारी यांच्या नावाचा विचार करण्यात आला. मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून त्यांच्या नावाला दुसर्या क्रमांकाची पसंती मिळाली. या निवडणुकीच्या निमित्ताने नव्या राजकारणाची मोट बांधण्याची संधी मिळून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बेनर्जी यांना वेसन घालण्यास काँग्रेसला निमित्त मिळाले आणि राष्ट्रपती पदाची उमेदवारी प्रणव मुखर्जींच्या गळ्यात पडली.

उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरविताना सर्वसहमती व्हावी, या दृष्टीने बैठकीत असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्याशी संपर्क साधला. मात्र एनडीएचा  अन्सारी यांच्या नावाला विरोध असल्याचे त्यांना सांगण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.