स्विस बँकेच्या १०० खातेदारांना माफीचा प्रस्ताव

नवी दिल्ली दि.११ – स्विस बॅकेच्या लॉकरमध्ये असलेला जवळपास ४५लाख कोटी रुपये एवढा काळा पैसा परत भारतात यावा म्हणून स्विस बँकेच्या  १०० खातेदारांना केंद्र सरकारने सशर्त माफीचा प्रस्ताव ठेवला आहे.

या संबंधी एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, पीएलसीच्या एचएसबीसी बँकेच्या जिनेव्हा शाखेतून पैसे काढून ते भारतात जमा करावेत, असे करचोरी करणार्‍या नागरिकांना सांगण्यात आले आहे. या रकमेवर कर भरण्यात यावा, त्याबदल्यात आयकर विभाग त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कारवाई करणार नाही. हा विभाग दंडही वसूल करणार नाही. विदेशातील बँकेत किती भारतीय खातेदार आहेत, याची माहिती सरकारने उघड केली नाही. फ्रान्स अधिकार्‍याने गेल्यावर्षी भारताला सोपविलेल्या यादीत ७०० नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. यातील १०० लोकांना माफीचा प्रस्ताव देण्यात आला असून उर्वरित लोकांची चौकशी केली जात आहे.

माफी प्रस्तावाबाबत टॉरस अँसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकिय संचालक आर. के. गुप्ता म्हणाले की, विदेशातून काळा पैसा आणणे ही जागतिक समस्या आहे. त्यामुळे हा व्यावहारिक प्रस्ताव आहे. कर चुकवेगिरी करण्यासाठी विदेशात पैसा दडवणार्‍या नागरिकांचा शोध घेणार्‍या अमेरिका, इंग्लंड आदी देशांमध्ये भारताचा समावेश आहे.