ठाकरे परिवारने विकत घेतले क्रिकेट क्लब

मुंबई दि..१३- भारतात राजकारणी आणि क्रिकेट यांचे संबंध फार पूर्वीपासूनच आहेत. शिवसेनेने मात्र हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. गेल्या कांही महिन्यात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य यांनी एमसीएचे दोन कलब चक्क विकतच घेतले आहेत. कांही अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे यांनी चार क्लब विकत घेतले आहेत. मेरी क्रिकेटर्स क्लब आणि यंग फ्रेंडस युनियन क्रिकेट कलब विकत घेतल्याच्या वृत्ताला एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सी.एस. नाईक यांनीही दुजोरा दिला आहे. समजलेल्या वृत्तानुसार आणखी दहा क्रिकेट क्लब विकत घेण्यासाठीची बोलणी सुरू आहेत.

एमसीएच्या निवडणुका २०१३ साली होत आहेत. ठाकरे यांनी खरेदी केलेल्या क्लबमुळे त्यांना या निवडणुकांत मोठी मदत होऊ शकणार आहे. नियमाप्रमाणे एमसीएची निवडणूक लढविताना उमेदवार एकतर कलबचा मालक तरी हवा किंवा संबंधित क्लबने त्याला नॉमिनेट करायला हवे.एमसीएच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच राजकारणी व्यक्तीने क्रिकेट क्लब खरेदी केली असल्याची घटना घडली आहे.

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, शिवसेना नेते व माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी यापूर्वी एमसीएचे अध्यक्षपद भूषविले आहे. सध्या केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख हे अध्यक्ष आहेत. काँग्रेसचे मंत्री नारायण राणे यांनीही या संघटनेने प्रतिनिधित्व केले आहे मात्र आजपर्यंत कुणीच कुठला क्रिकेट क्लब विकत घेतलेला नाही.

आदित्य ठाकरे याचा जीवलग मित्र रजत मेहता याच्याकडे वेलिंग्टन क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व असून न्यू हिंद क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व उद्धव ठाकरे यांचे वैयक्तीक सचिव मिलींद नार्वेकर यांच्याकडे आहे. हे दोन्ही क्लबही ठाकरे यांनीच विकत घेतले असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांना क्रिकेटचा खूपच नाद असून शाळेकडून ते क्रिकेट स्पर्धा खेळलेले आहेत असेही समजते.

Leave a Comment