मनमोहनसिंग यांची प्रतिमा

अमेरिकेतल्या `टाईम’ या साप्ताहिकाने आपल्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे छायाचित्र छापले असून, आतल्या पानांवर डॉ. मनमोहनसिंग यांच्या कामगिरीचे विश्‍लेषण करणारा लेख छापला आहे. पंचवीस वर्षांपूर्वी परिस्थिती फारच वेगळी होती. टाईमसारख्या प्रतिष्ठित साप्ताहिकात तर सोडाच, पण अमेरिकेतल्या सामान्य दर्जाच्या दैनिकातसुद्धा भारताविषयीची छोटीशी बातमी सुद्धा छापून येत नसे. पण आता भारताच्या पंतप्रधानांच्या छायाचित्राचे मुखपृष्ठ छापण्यापर्यंत मजल गेली आहे. याचा अर्थ अमेरिकेतल्या साप्ताहिकांना भारत ही एक दखलपात्र शक्ती वाटते, असा होतो. १९७० च्या दशकामध्ये एकदा `टाईम’ या साप्ताहिकाने भारताची दखल घेतली होती आणि इंदिरा गांधी यांच्यावर एक लेख छापलेला होता. अर्थात, त्यावेळी मुखपृष्ठावर सुद्धा इंदिरा गांधींचेच छायाचित्र होते. त्या काळामध्ये इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे विभाजन करून बांगला देश निर्मितीला चालना दिलेली होती आणि पोखरणच्या वाळवंटामध्ये अण्वस्त्र चाचणी घेऊन जगाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी या दोन्ही घटना अमेरिकेच्या पचनी पडणार्‍या नव्हत्या. त्यामुळे टाईमने इंदिरा गांधींची दखल घेतली असली तरी लेखामध्ये प्रत्यक्षात त्यांची निंदानालस्तीच केली होती. त्यानंतर २००३ साली एकदा अटलबिहारी वाजपेयी यांची दखल घेतली.

या निमित्ताने लिहिलेल्या लेखात वाजपेयी यांची सुद्धा निंदाच केलेली होती. या दोन्ही मजकुरांवर बरेच वादळ निर्माण झाले होते. कारण हे दोन्ही पंतप्रधान सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेत होते आणि नेमके त्याचवेळी अमेरिकेचे हे साप्ताहिक या दोघांच्याही वैयक्तिक जीवनातील काही प्रतिकूल गोष्टींचा उल्लेख करून त्यावर जाणीवपूर्वक भर देऊन त्यांची प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न करत होते. अलीकडच्या काळात टाईम साप्ताहिकाने सोनिया गांधी यांची दखल घेतली आणि त्या भारतातल्या शक्तीशाली महिला नेत्या आहेत, असा उल्लेख केला. त्या पाठोपाठ नरेंद्र मोदींची दखल घेतली आणि ते भारताचे भावी पंतप्रधान आहेत, तसेच त्यांच्यामध्ये देशाच्या विकासाला चालना देण्याची जबरदस्त क्षमता आहे असे प्रतिपादन केले. त्यामुळे एक गोष्ट झाली की, भारत देश हा अमेरिकेने दखल घ्यावी इतका मोठा आणि प्रभावशाली देश झालेला आहे आणि हे अमेरिकेला मान्य आहे हे सिद्ध झाले. भारत ही आता जगातली सहाव्या क्रमांकाची आर्थिक शक्ती असल्यामुळे या देशात घडणार्‍या घटनांचा बरा-वाईट परिणाम जगाच्या राजकारणावर आणि अर्थकारणावर होत असतो. म्हणूनच भारतातल्या छोट्या-मोठ्या घटनांची दखल या साप्ताहिकाला घ्यावी लागते.

आता मनमोहनसिंग यांच्यावर या साप्ताहिकाने एक लेख लिहिलेला आहे. कारण मनमोहनसिंग यांची कामगिरी कशी होते यावर केवळ भारताचेच नव्हे तर जगाचे भवितव्य ठरणार आहे. म्हणून या साप्ताहिकाने मनमोहनसिंग यांच्याविषयी काय म्हटलेले आहे हे समजूनही घेण्याची गरज आहे. मनमोहनसिंग यांची दखल घेताना टाईमच्या दृष्टीकोनात थोडा बदल झालेला दिसत आहे. यावेळी टाईमने इंदिराजी आणि वाजपेयी यांच्या प्रमाणे वैयक्तिक टीका-टिपण्णी केलेली नाही, तर भारताच्या आजच्या आर्थिक चित्राचे आपल्या परीने योग्य विश्‍लेषण केलेले आहे. त्यामागे त्यांचा हेतू काय आहे, याविषयी चर्चा करण्यात अर्थ नाही. कारण त्यांचा हेतू काहीही असला तरी त्यांनी मनमोहनसिंग यांना वाईट कामगिरी करणारा पंतप्रधान ठरवले आहे.

मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला गती दिली, तिच्यात मोठे परिवर्तन घडवून आणले, त्यानंतर ते पंतप्रधान झाले आणि त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात देशातला आर्थिक विकासाचा वेग ९ टक्क्यांपर्यंत नेला. त्यांची ही कामगिरी नाही असे कोणीच म्हणणार नाहीत. `टाईम’ साप्ताहिकाने सुद्धा तसे म्हटलेले नाही. मनमोहनसिंग यांच्या पहिल्या कारकिर्दीबद्दल टाईमने त्यांचा गौरवच केलेला आहे. परंतु त्यांची दुसरी कारकीर्द ही पहिल्या कारकिर्दीपेक्षा डावी आहे हे खरे आहे. ती गोष्ट कॉंग्रेसचे नेते सुद्धा नाकारत नाहीत. या कारकिर्दीमध्ये विकासाचा वेग घटला आहे. देशामध्ये विशेष करून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड झाली आहेत आणि त्यातल्या एकेका प्रकरणाने कॉंग्रेस पक्ष तसेच सत्ताधारी संपु आघाडी त्रस्त झालेली आहे. या प्रकरणांमुळे पंतप्रधान विचलित झालेले आहेत आणि त्याचा परिणाम राज्यकारभारावर झालेला आहे. पंतप्रधानांचे अनेक निर्णय या विचलित परिस्थितीमुळे बाधित झाले असून, त्यांना आपला परफॉर्मन्स् दाखवून देता आलेला नाही. देशाला आर्थिक विकासाकडे नेणारे अनेक विधेयके प्रलंबित आहेत आणि जनतेच्या मनातून मनमोहनसिंग उतरले आहेत.

टाईमने मांडलेले हे वास्तव कॉंग्रेस पक्षाच्या गळी नीट उतरलेले नाही. म्हणून पक्षाच्या प्रवक्त्यांनी टाईमच्या या विश्‍लेषणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मनमोहनसिंग यांनी दहा वर्षे  देशाला स्थैर्य दिलेले आहे आणि त्यांची ही कामगिरी स्पृहणीय आहे, असे कॉंग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. स्थैर्य दिले असले तरी मनमोहनसिंग यांनी देशातला भ्रष्टाचार निपटून काढण्यात निग्रही पावले टाकलेली नाहीत ही गोष्ट कॉंग्रेसचे नेते लपवून ठेवत आहेत.

Leave a Comment