मुंबई, दि. ११ – स्थानिक बोली भाषांचे जतन करण्याच्या दृष्टिने एक नवीन उपक्रम चालू होत आहे. मुंबईसह पश्चिम भारतात बोलल्या जाणार्या बोली भाषा रेकॉर्ड करुन त्यांचा शब्दकोश तयार करण्यात येणार आहे. बोली भाषांचे जतन करण्याचा हा प्रकल्प मुंबई गावठाण पंचायत या संस्थेने हाती घेतला आहे. या प्रकल्पातून गावराण भाषा बोलणार्या लोकांचे हित जपणाच्या दृष्टिने भाषा संवर्धनाचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा शब्दकोश मराठी आणि इंग्रजी भाषेत असणार असून, त्यामार्फत स्थानिक भाषांचे संवर्धन करण्यात येणार आहे अशी माहिती पंचायतीचे अध्यक्ष गिल्सन बार्टो यांनी दिली. भारताच्या पश्चिम भागात राहणार्या लोकांमध्ये स्थानिक ख्रिश्चन लोकांबरोबरच हिंदू समाजातील काही समुदायांचा समावेश होतो.
बोली भाषा रेकॉर्ड करुन त्यांचा शब्दकोश तयार करण्यात येणार
अनेक टीम या शब्दकोशासाठी एकाच वेळी काम करणार आहेत. आम्ही वेगवेगळ्या भागात स्थानिक समुदायामार्फत बोलल्या जाणार्या बोली भाषांचा या प्रकल्पात प्रामुख्याने समावेश केला आहे.
वांद्राला वेगळी मराठी बोलली जाते आणि मरोळसारख्या गावठाण भागात वेगळी मराठी बोलली जाते, हे आपल्याला माहित आहे. या आणि अशा अनेक सूक्ष्म बाबींचाही आम्ही अभ्यास करणार असल्याचे प्रकल्पाच्या आयोजकांपैकी एक असणार्या प्रेम मोराइस यांनी सांगितले.
सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख, फ्यूअर डिसोझा यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना बोली भाषा दिवसोंदिवस नामषेश होत चालल्या आहेत. बोली भाषेमुळे स्थानिक समुदायंना एक आत्मविश्वास मिळतो आणि त्यांना आपल्या भाषेची आवड निर्माण करण्यास मदत होते असे मत व्यक्त केले. हा प्रकल्प राबवताना या क्षेत्रातील जाणकारांची मदत घेऊन हा प्रकल्प व्यवसायीकपणा जपण्याकडे खास लक्ष द्यावे असा सल्लाही डिसोझा यांनी दिला. मराठी बोली भाषांवर छाप पाडणार्या सांस्कृतीचाही या प्रकल्पात अभ्यास केला जावा अशी इच्छाही डिसोझा यांनी बोलून दाखवली.
डॉक्युमेंट्री फिल्म निर्माता आणि पाश्चात्य स्थानिक संस्कृतीचे अभ्यासक लूकी मेन्डीस यांनी या प्रकल्पाकडे दूरदृष्टीने पहाणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. कोकणात प्रमुख्याने बोलली जाणारी कोकणी भाषाच मुंबईची मूळ भाषा आहे. तरी महाराष्ट्राच्या स्थापनेच्या आधीपासूनच कोकणात वेगवेगळ्या भागात वेगळ्या लहेजात बोलली जाते.
मुंबई भागात बोलल्या जाणार्या कोकणी भाषेवर अनेक संस्कृतींचा प्रभाव आहे. पोर्तुगीज राजवटीमुळे पोर्तुगीज भाषेचाही कोकणी भाषेवर प्रभाव पडला आहे असे मेन्डीस म्हणाले. मोराइस यांनी हा प्रकल्प पुढील मे महिन्यापर्यंत तयार होईल आणि तो वेबसाइटवरही प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
