शेतकऱ्यांनी स्वीकारला वैज्ञानिक दृष्टिकोन

सांगली दि. १० – वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे शेतकर्‍यांची गती वाढत असल्याचा धडा सांगली जिल्ह्यातही शेतकर्‍यांनी घालून दिला आहे.

शेती  म्हटले की निसर्गाची आपत्ती आणि सरकारी व्यवस्थेचा दणका हा बसतोच. शेतकऱ्यांच्या या अडचणींवर मात करण्यासाठी सात वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील रेठरेहरणाक्ष गावातील शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी राजाराम कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. शेतकर्‍यांचे समाधान हे उत्पादनवाढीशी निगडीत असल्याने विज्ञान मंडळाने शेतकर्‍यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरु केले. तसेच त्यांचा उत्पादन खर्च ही कमीच असायला हवा यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण यश येईना मग, त्यांनी थेट कृषी विक्री केंद्र सुरु केले आणि माल खरेदी करतांना होणारी लूट थांबवली.

११ सदस्यांच्या या विज्ञान मंडळात कृषी पदवीधरांची संख्या जास्त असल्याने खते, बियाणे, कीडनाशके यांच्या वापराबाबत माहिती देण्यास ते थेट शेतकर्‍यांच्या शेतावरच भेटू लागले. परिणामी शेतकर्‍यांनी विश्वास दाखवला आणि त्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ दिसून आली आणि तीही कमी खर्चात.

सुरुवातीला विज्ञान मंडळ उभारतांना भांडवलाची गरज होती त्यासाठी एका पतसंस्थेमध्ये कृषी विज्ञान मंडळाने कर्जाचे कॅशक्रेडिट केले. रोजच्या रोज रक्कमेचा भरणा या खात्यावर केला जातो, तर संपूर्ण संचालक मंडळ यासाठी जामीन आहे.  १० लाखाहून अधिक रक्कमेची खते आणि कीडनाशके मंडळाकडे उपलब्ध आहेत. ना नफा ना तोटा या तत्वावर हे मंडळ सध्या शेतकर्‍यांच्या विश्वासावर चालवले जात आहे.