येडीयुरप्पांसमोर शरणागती

भारतीय जनता पार्टीने येडीयुरप्पा यांच्या म्हणण्यानुसार नेतृत्व बदल केला आहे. यातून येडीयुरप्पा यांचे समाधान झाले आहे: पण येत्या वर्ष दीड वर्षात कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत हा येडीयुरप्पा शरण पक्ष जनतेला कसा सामोरा जाणार आहे आणि जनतेला काय सांगून मते मागणार आहे, हा एक मोठाच प्रश्‍न आहे. अर्थात, तो प्रश्‍न आपल्याला पडला आहे आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना या प्रश्‍नाने अस्वस्थ केलेही असेल पण येडीयुरप्पा यावर काय म्हणत आहेत ? त्यांना काय वाटते ? आपण जनतेला निरपराध आहोत हे कसे सांगणार आहोत ? काही समजत नाही. कर्नाटकात भारतीय जनता पार्टीला सत्ता मिळाली. स्पष्ट बहुमत मिळाले नाही तरी त्यांनी अनेक हिकमती करून या काठावरच्या बहुमताचे रूपांतर स्पष्ट बहुमतात केले. ते करताना पक्षाची सारी तत्त्वे आणि साधनशुचिता गुंडाळून ठेवली. शेवटी त्यांना बहुमत मिळाले पण पक्षाची प्रतिमा धुळीला मिळाली.

आता तर तिसरा मुख्यमंत्री सत्तेवर येत असल्याने पक्षातले सारे मतभेद जगासमोर सप्रमाण आले आहेत. भाजपाच्या नेत्यांनी अनेकदा आपला पक्ष म्हणजे पार्टी वुइथ डिफरन्स असल्याचा दावा केला आहे. राज्याराज्यातल्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.  पण जुन्या नेत्यांचा तसे म्हणण्यामागचा भाव वेगळा होता. पूर्वी डिफरन्सचा अर्थ वेगळा होता. आपला पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे असे त्यांना म्हणायचे होते पण आता याच डिफरन्सचा अर्थ मतभेद असा करून पक्षाने आपला पक्ष भरपूर मतभेदांनी भरलेला आहे हे दाखवून दिले आहे. भाजपात पूर्वी जी गोष्ट अजिबात होत नव्हती ती आता भाजपात घडत आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री  येडीयुरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून घरी पाठवण्यात आले. ही गोष्ट भाजपाचा पार्टी वुइथ डिफरन्सच्या वाद्यातली हवा काढून घेण्यास कारणीभूत ठरली. हे प्रकरण यावर थांबले नाही.  दक्षिणेतले कर्नाटक हे राज्य हाती आल्याच्या चार  वर्षात भाजपाने तीन मुख्यमंत्री दिले. येडीयुरप्पा यांना पक्षाने तीन वर्षे संधी दिली. पण त्यांनी आपले पद भ्रष्टाचारात गमावले. नंतर सदानंद गौडा मुख्यमंत्री झाले पण येडीयुरप्पा यांचा न्यूनगंड वाढायला लागला. आपल्याला सत्तेवरून जावे लागले पण निदान आता येणारा मुख्यमंत्री आपल्या कलाने वागणारा असावा असा त्यांचा हट्ट होता. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या जागी नेमका त्यांना न मानणारा सदानंद गौडा  हा मुख्यमंत्री नेमला. तेव्हापासून येडीयुरप्पा श्रेष्ठींवर चिडलेले होते.

सदानंद गौडा हे वक्कलीग समाजाचे आहेत. पक्षातले येडीयुरप्या यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अनंतकुमार यांनी सदानंद गौडा यांच्या नावाचा आग्रह धरला आणि श्रेष्ठींनी तो मानला. येडीयुरप्पांना लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री हवा होता.  त्यामागे श्रेष्ठींचा येडीयुरप्पा यांचे खच्चीकरण करण्याचा तर इरादा होताच पण आपण भ्रष्टाचारी येडीयुरप्पा यांना वगळून नेता निवड करत आहोत म्हणजे भ्रष्टाचाराला विरोध करीत आहोत असे दाखवण्याचाही हेतू होता. पण येडीयुरप्पांना हे सहन झाले नाही. मुळात त्यांना आपला राजीनामा घेतलाय हेच पसंत नाही. जयललिता आणि पी. चिदंबरम यांच्यावरही भ्रष्टाचाराचे खटले आहेत.

केन्द्रीय मंत्रिमंडळात विलासराव देशमुख आहेत, त्यांना तर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अशा स्थितीत जयललिता, चिदंबरम आणि देशमुख सत्तेवर राहू शकतात मग आपण का नाही राहू शकत असा त्यांचा सवाल आहे. आपल्यावरचे आरोप खोटे आहेत. पण ते खोटे आहेत हे सिद्ध करायला १० ते १२ वर्षे लागतील. मग तोवर आपल्याला सत्तापासून दूर ठेवण्याची गरजच काय, या त्यांच्या म्हणण्यावर श्रेष्ठींकडे काही उत्तर नाही.  आपल्याला पायउतार व्हायला लावले आहे निदान नवा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला नेमा अशी त्यांची मागणी होती. ती श्रेष्ठींनी मान्य केली आहे. येडीयुरप्पा यांच्या जातीतला आणि निदान आता तरी येडीयुरप्पा यांच्या ऐकण्यात असलेला मुख्यमंत्री गौडा यांच्या जागी नेमला आहे.

येडीयुरप्पा यांना सत्तेचा धर्म माहीत नाही. सदानंद गौडा त्यांचे ऐकत नव्हते म्हणून त्यांना बदलले पण शेट्टर तरी येडीयुरप्पा यांच्या ओंजळीने पाणी पीणार आहेत याची काही खात्री देता येते का ? किंबहुना आपण आताच खात्रीने सांगू शकतो की काही दिवस शेट्टर हेही येडीयुरप्पांच मान ठेवतील पण काही दिवसांनी ते आपल्या मनाप्रमाणे कारभार करायला लागतील. तेव्हा येडीयुरप्पा काय वारंवार नेता बदलाची मागणी करणार आहेत का ? मुळात येडीयुरप्पा यांचे कर्नाटकात एवढे वजन नाही की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दरबारात हजेरी लावून त्यांना कुर्निसात करून कारभार करावा. त्यांच्याकडे काही उपद्रव मूल्य आहे. त्यामुळे श्रेष्ठी त्यांना मानतात आणि त्याचा गैरफायदा ते घेतात.आताही येडीयुरप्पांनी याच मूल्याचा वापर करून आपल्या मनाप्रमाणे सत्ता बदल घडवून आणला आहे. आता त्यांच्यावर कर्नाटकात पक्षाला सत्तेवर आणण्याची जबाबदारी नकळतपणे येऊन पडली आहे. त्यांनी तसेच काही तरी सांगून आपल्या मर्जीतला मुख्यमंत्री नेमायला लावला आहे.

Leave a Comment