भंगारातून बनवले हेलिकॉप्टर

सांगली, दि. ८ – सांगलीतल्या प्रदीप मोहिते या २८ वर्षीय युवकाने भंगाराच्या वस्तूंमधून हेलिकॉप्टर तयार केले आहे. सध्या हे हेलिकॉप्टर चार फूट उंच उडते. त्याला मदतीचा हात मिळाल्यास त्याचे हेलिकॉप्टर भरारी घेऊ शकेल.

उदरनिर्वाहासाठी गॅरेजकाम करणार्‍या सांगलीच्या प्रदीप मोहिते याने चक्क भंगारातून हेलिकॉप्टर बनवले आहे. वेगळे काही करायच्या जिद्दीतून प्रदीप नवे प्रयोग करु लागला. त्यातच `थ्री इडियट’ हा चित्रपट पाहून त्याला हेलिकॉप्टर तयार करायची कल्पना सुचली. दिवसभर गॅरेजमध्ये काम करुन मिळणार्‍या पैशातून त्याने साहित्याची जमवाजमव केली. लोखंडी पाईप, पत्रा आणि इतर साहित्य खरेदी करून त्याचे हेलिकॉप्टर आकाराला आले. आतापर्यंत त्याला अडीच लाख रुपये खर्च आला असून आणखी दीड ते दोन लाख रुपयांची गरज आहे.

प्रदीपने तयार केलेल्या हेलिकॉप्टरचे वजन ४८० किलो असून, एका तासाला त्याला दोन लिटर पेट्रोल लागते. जिल्ह्यातल्या उद्योजक आणि संस्थांनी मदत केली तर त्याचे हेलिकॉप्टर मोठी भरारी घेईल.