१०० वर्षांची रोल्स राईस- किंमत बेचाळीस कोटी

युनिक म्हणता येईल अशी १०० वर्षांपूर्वीची, रॉल्स रॉईसची सिल्वर घोस्ट कार बॉनैहॅम सेल ने केलेल्या लिलावात तब्बल पाच मिलियन डॉलर्स म्हणजे साडे बेचाळीस कोटी रूपयांना विकली गेली असून जुन्या कारला आजपर्यंत लिलावात मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे असे समजते. १ गॅलन पेट्रोलमध्ये १५ मैलांचा टप्पा गाठणारी ही सिल्व्हर घोस्ट आजही ६० किमी प्रति तास पळू शकते. रॉल्स रॉईसने आजपर्यंत ज्या गाड्या बनविल्या त्यातील सर्वोत्तम गाड्यांतील ही एक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

१९१२ साली तयार झालेल्या या गाडीची किमत तेव्हा १ हजार डॉलर्स होती. म्हणजे ८२ हजार ५०० रूपये. तिचा अमेरिकन मालक मरण पावल्यामुळे या गाडीचा लिलाव करण्यात आला. लिलावात सुरवातीची बोलीच १ लाख डॉलर्सची लागली आणि ती लावायला तीन जण पुढे सरसावले होते. नंतर एकाने माघार घेतली तरी दोघे चढाओढीने बोली लावतच होते. बॉनहॅम सेलचे जेम्स नाईट यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनाही या गाडीला फारतर वीस लाख डॉलर्स मिळतील अशी अपेक्षा होती मात्र लिलावात आकडे चढत गेले आणि ही गाडी तब्बल पाच मिलीयन डॉलर्सला म्हणजे पन्नास लाख डॉलरला विकली गेली. अर्थात खरेदीदाराचे नांव अज्ञात आहे.

विशेष नवलाची बाब अशी की १०० वर्षापूर्वीच्या या गाडीचे हेडलाईट, कॅरिएज लाईट, रियर लाईट आणि टायर्स अजूनही उत्तम स्थितीत आहेत. ती अजूनही अजिबात आवाज न करता धावते. जेम्सच्या म्हणण्याप्रमाणे आजपर्यंत सर्वात अधिक काळ चाललेला हा कारचा लिलाव होता आणि या कारला मिळालेल्या किमतीमुळे त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आता ही कार आपला प्रवास अज्ञात मालकाच्या इच्छेप्रमाणे नव्याने सुरू करेल.