सदानंद गौडांची गच्छन्ति अटळ

नवी दिल्ली दि,५ – कर्नाटकात निर्माण झालेला पेचप्रसंग सोडविण्यासाठी आणि येडियुरप्पा समर्थकांनी नेतृत्व बदलासाठी ५ जुलैची दिलेली अंतिम मुदत लक्षात घेता  भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना नारळ देण्याचा निर्णय घेतल्याने आता गौडांची गच्छन्ति अटळ आहे. सदानंद गौडा यांच्या जागी येडियुरप्पानिष्ठ ग्रामविकास  पंचायत राज मंत्री जगदिश शेत्तार यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली जाण्याची चिन्हे आहेत.
 
भाजपमधील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी  मुख्यमंत्री सदानंद गौडा, शेत्तार आणि प्रदेशाध्यक्ष ईश्वरप्पा यांची  दिल्लीत मंगळवारी बाजू ऐकून घेतली. आता या प्रकरणी पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल. सोमवार ते बुधवार दरम्यान केव्हाही निर्णय अपेक्षित आहे. कारण, नवीन नेता व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी हा १६ जुलै रोजी सुरू होणार्‍या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी होणे अत्यंत आवश्यक आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच, जातीचे समीकरण राखण्यासाठी राज्यात उपमुख्यमंत्रिपद निर्माण केले जाईल तसेच, प्रदेशाध्यक्षपदी नवीन नेत्याची निवड केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सदानंद गौडांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदी करावी काय, याचा निर्णय अद्याप पक्षश्रेष्ठींनी घेतला नाही. नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्तीस असंतुष्ट गटाचा विरोध नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
बंगळुरू येथे पुढील आठवड्यात विधिमंडळ पक्षाची बैठक होईल व त्यात नवीन नेत्याची निवड केली जाईल. पक्षाने लिंगायत समाजातील नेते शेत्तार यांची नेतेपदी निवड करण्यास संमत्ती दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.