पुणे-कोचीन थेट विमानसेवा सूरू

पुणे, दि. १ – मल्याळी संघटनांच्या पाठपुराव्यामुळे आजपासून स्पाईसजेट एअरलाईन्सची पुणे-कोचीन थेट हवाई-सेवा सुरू होत आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील मल्याळी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस असणार आहे. अशी सेवा सुरू करण्यासाठी, मल्याळी समाजाचे प्रतिनिधीत्व करणा-या पुण्यातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनी, हवाई वाहतूक मंत्रालय आणि खाजगी एअरलाइन्स कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी, संपर्क साधला होता. या थेट सेवेमुळे समाजाला फायदा तर होईलच; पण त्यामुळे पर्यटन, संस्कृती, व्यापार यांना चालना मिळेल आणि पुणे हे शैक्षणिक शहर असल्याने शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना यामुळे लाभ होईल. या हवाई सेवेमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आदी शहरवासियांच्या गरजाही पुर्ण होऊ शकतील. कोकण रेल्वे सुरु झाल्यामुळे बर्‍याच रेल्वेगाड्या ज्या पुणेमार्गे धावत होत्या. त्या आता बंद होऊन पनवेलमार्गे जातात. त्यामुळे आणिबाणीच्या परिस्थितीत या समाजातील लोकांना आपल्या गावी पोहोचण्यास भरपूर खर्च होतो.

सदरील सेवेमुळे पुण्याहून थेट कोचीन येथे विमानसेवेचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे. स्पाइस जेट लिमिटेड कंपनी आधुनिक बोइंग ७३७ ही विमाने या हवाई मार्गावर देणार आहे. स्पाइस जेट कंपनी कोचीन-पुणे मार्गावर आठवड्यातील सहा दिवस (शनिवार वगळून) ही सेवा देणार आहे. पुणे विमानतळावरून कंपनीचे विमान सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी सुटेल व दुपारी एक वाजून १० मिनिटांनी कोचीनला उतरेल. तसेच कोचीनहून पुण्यास येणारे विमान दुपारी दोन वाजता सुटेल व दुपारी तीन वाजून ५५ मिनिटांनी पुण्यात उतरेल.